गौतम बचुटे
केज: तालुक्यातील एका गावातून १५ वर्षीय वयाच्या अल्पवयीन मुलीचे अपहरण करण्यात आले आहे.या बाबतची माहिती अशी की, केज तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीचे वडील साखर कारखान्याच्या ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनावर ड्रायव्हर असून ते शेतातच राहतात.
शनिवार १ नोव्हेंबर रोजी रात्री ८:३० वाजण्याच्या सुमारास त्या अल्पवयीन मुलीचे गावातील एका तरुणाने अपहरण केले. रात्री मुलगी घरी न आल्यामुळे आईने नातेवाईकडे शोध घेतला असता; ती आढळून आली नाही.
दरम्यान २ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजता मुलीच्या वडीलांनी केज येथे तिचा शोध घेतला. त्यांना गावातील एका तरुणाने फोनवरून सांगितले की, तुमची मुलगी माझ्यासोबत आहे. त्या तरुणाला मुलीच्या वडिलांनी मुलीला घरी आणून सोड, असे सांगून देखील त्याने मुलीला तिच्या कुटुंबाच्या ताब्यात दिले नाही.
रविवारी २ नोव्हेंबर रोजी अपहरण झालेल्या मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरून अपहरणकर्त्या तरुणाविरुद्ध केज पोलिस ठाण्यात गु. र. नं. ६०४/२०२५ भा. न्या. सं. १३७(२) नुसार गुन्हा करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक उमेश निकम हे तपास करीत आहेत.