माजलगाव: माजलगाव धरण क्षेत्राच्या भागात शनिवारी (दि.१३) जोरदार पावसाने झोडपले. रविवारी (दि.१४) सकाळी माजलगाव धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू झाल्याने दुपारी 12 वाजता धरणाचे 11 दरवाजे उघडण्यात आले. पंधरा दिवसांपूर्वी माजलगाव धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने दोन दिवस नऊ दरवाजे सोडण्यात आले होते. त्यानंतर तीन दरवाज्यातुन सिंदफणापात्रात पाण्याचा विसर्ग सुरूच होता.
शनिवारी संध्याकाळी धरणाच्यावरील भागात जोरदार पाऊस झाल्याने रविवारी सकाळपासून धरणाची पाण्याची आवक वाढु लागली होती. सकाळी 11 वाजता सात दरवाजाद्वारे अर्ध्या मीटरने दरवाजे उचलुन पाणी सोडण्यात आले. आवक वाढत राहिल्याने रविवारी (दि.१४) साडेबारा वाजता 0.80 मिटरने 11 दरवाजे उघडुन त्याद्वारे 31 हजार 335 क्युसेक्स एवढे पाणी सिंदफणा नदी पात्रात सोडण्यात आले.
गोदावरी व सिंदफना नदीपात्रात मोठी आवक सुरू असल्याने माजलगाव तालुक्यातील सिंदफणा नदीपात्राला लागून असलेले 8 व गोदावरी नदीपात्राला लागुन असलेल्या 24 गावांना पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे माजलगावचे तहसीलदार संतोष रुईकर यांनी नदीकाठच्या गावांना अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. तर आवक वाढत राहिल्यास दरवाजे आणखी वरती उचलण्यात येऊ शकतात अशी माहिती धरणाची शाखाधिकारी गणेश झापूगडे यांनी दिली आहे.