बीड : बीडमध्ये शुक्रवारी मेळाव्याच आयोजन करण्यात आलं होतं. या मेळाव्याला मनोज जरांगे पाटील यांनीदेखील आवर्जून हजेरी लावली. या मेळाव्यात भाषण करत असताना मनोज जरांगे पाटील यांना अचानक चक्कर येऊ लागली. पण मनोज जरांगे यांनी सुरुवातीला त्याकडे दुर्लक्ष केलं. यानंतर जास्त चक्कर येत असल्याने त्यांनी मंचावर खाली बसून भाषण केलं. पण त्यांना जास्त होत असल्याने तातडीने जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मनोज जरांगे यांच्यावर बीडमधील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
शुक्रवारी सायंकाळी बीड शहरातील एका मंगल कार्यालयात मराठा समाजातील शिक्षक कर्मचाऱ्यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मनोज जरांगे पाटील यांचे प्रमुख उपस्थित होते परंतु मनोज जरांगे यांना प्रकृती बिघडल्यामुळे भाषण देखील व्यवस्थित करता येत नव्हते. तरीही त्यांनी आपलं भाषण पूर्ण केलं. हा मेळावा उरकून आयोजकांनी मनोज जरांगे यांना तातडीने बीडमधील रुग्णालयात दाखल केलं.
संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख देखील या कार्यक्रमात हजर होते. यावेळी व्यासपीठावर मनोज जरांगे पाटील आणि धनंजय देशमुख भावूक झाले. संतोष देशमुख यांच्या हत्येचा घटनाक्रम सांगताना मनोज जरांगे पाटील, धनंजय देशमुख आणि उपस्थित महिला गहिवरल्या.
मराठा समाजाने एकजूट कायम ठेवण्याचे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी केलं. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीवर जाईपर्यंत शांत बसणार नाही, असं एल्गार मनोज जरांगेंनी यावेळी केला. बीडमध्ये शिक्षक, प्राध्यापक, डॉक्टर, केमिस्ट, वकील, इंजिनिअर आणि कर्मचारी संघटनाचा मेळावा पार पडला.