गेवराई : मानमोडी येथे सोमवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी दोन बंगल्यांमध्ये घुसून रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा अंदाजे 8 ते 10 लाखांचा ऐवज लंपास केल्याची धाडसी घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मानमोडी गावापासून हाकेच्या अंतरावर मादळमोही रस्त्यावर मधुकर यमाजी येवले व बापूसाहेब यमाजी येवले या सख्ख्या भावांचे शेतात शेजारी-शेजारी दोन बंगले आहेत. सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी दोन्ही घरांचे दरवाजे उचकटून आत प्रवेश केला. घरातील कपाटांची तोडफोड करून नगदी सुमारे तीन लाख रुपये तसेच सोन्याचे दागिने असा मोठा ऐवज चोरट्यांनी लंपास केला.
मंगळवारी सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर तात्काळ गेवराई पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. दरम्यान डॉग स्कॉड व फिंगरप्रिंट पथकही घटनास्थळी दाखल झाले असून संशयितांचा शोध सुरू आहे. गेल्या काही दिवसांत ग्रामीण भागात चोरीच्या घटना वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या चोरट्यांचा लवकरात लवकर बंदोबस्त करून गस्त वाढवावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.