केज: बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील धनेगाव येथील मांजरा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे आज (दि. २९ ऑगस्ट) दुपारी १ वाजून ४५ मिनिटांनी प्रकल्पाचे सहा दरवाजे उघडण्यात आले. यामुळे मांजरा नदीपात्रात मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू झाला आहे.
मागील २४ तासांपासून केज तालुका आणि मांजरा नदीच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू आहे. यामुळे प्रकल्पात पाण्याची आवक वाढल्याने हा निर्णय घेण्यात आला. प्रकल्पाचे दरवाजे क्र. १, ३, ४, आणि ६ हे १ मीटरने उघडले आहेत, तर दरवाजे क्र. २ आणि ५ हे ०.७५ मीटरने उघडले आहेत. या सहा दरवाज्यांतून सध्या १९,२१८.५४ क्युसेक्स (५४४.२८ क्युमेक्स) पाणी नदीपात्रात सोडले जात आहे.
पाण्याच्या आवकानुसार हा विसर्ग कमी-जास्त केला जाऊ शकतो. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. प्रशासनासह मांजरा प्रकल्पाचे अभियंता पाटील यांनी नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.