Jalgaon sugarcane labour exploitation
माजलगाव : तालुक्यातील कवडगावथडी येथे जळगाव जिल्ह्यातील तब्बल तीस ऊसतोड मजुरांना डांबून ठेवून त्यांच्याकडून जबरदस्तीने वेठबिगारीचे काम करून घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या निर्देशानंतर तातडीने मोहिम राबवून सर्व मजुरांची सुटका करण्यात आली आहे.
तक्रारदार सखाराम तुकाराम सोनवणे (वय 25, रा. धरणगाव जि. जळगाव, सध्या रा. कवडगावथडी) यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की ते पत्नी, दोन मुली, आई यांच्यासह मजुरी करून उपजीविका चालवतात. दसऱ्यानंतर दोन दिवसांनी ऊसतोड मुकादम बाळु मगरे (रा. पाथरवाडा, जि. जालना) यांनी त्यांचा भाऊ देवाजी सोनवणे याला ऊसतोडीसाठी नेले. त्यानंतर सखाराम यांना फोन करून “तुम्ही कवडगाव येथे लगेच या, नाही आलात तर तुमचा भाऊ सोडणार नाही.”अशी धमकी दिली.
सखाराम यांच्यासह कुटुंबातील ज्योती, संगीता, पद्माबाई, दिपाली, रुपाली सोनवणे यांसह इतर 8–10 जणांनी 6 ऑक्टोबररोजी कवडगावथडी गाठले. तिथे आधीपासून देवाजी सोनवणे आणि इतर 20–22 जणांसह एकूण तीस मजूर डांबून ठेवलेले होते.
तेथे सोमेश्वर आबा आणि त्याचा मुलगा गणेश यांनी “ट्रॅक्टर भरा, काम करा, नाही तर हातपाय बांधून गंगेत फेकून देऊ.” अशा धमक्या देत शिवीगाळ केली. मजुरांना जेवणही दिले नाही. फड मालकांनी दिलेलेच जेवण खाऊन त्यांना काम करावे लागत होते. मुकादम बाळु मगरे उचल रक्कम न देता मजुरांना सतत कामाला लावत होता. सोबत असलेल्या लहान मुलांनाही ऊसतोडीचे काम करायला लावण्यात आले.
१४ ऑक्टोबररोजी काम सुरु असताना तहसिलदार, पोलीस अधिकारी, जळगावमधील अधिकारी तसेच महिला पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून तीसही मजूर तहसील कार्यालयात सुरक्षितपणे हलवले.
या प्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात मुकादम बाळु मगरे, ट्रॅक्टर मालक सोमेश्वर आबा, त्याचा मुलगा गणेश अशा तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पवन निंबाळकर करीत आहेत.