Crime News Pudhari file photo
बीड

Beed Crime | माजलगावात कट मारल्याच्या वादातून मारहाण; पाच जणांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा

मुख्य रस्त्यावर तणाव; पाच आरोपी पोलिसांच्या ताब्यात

पुढारी वृत्तसेवा

Atrocity case Majalgaon

माजलगाव : शहरातील मुख्य रस्त्यावर असलेल्या चव्हाण हॉस्पिटल, माजलगाव समोर स्कुटीला कट मारल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून मारहाण व जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी पाच जणांविरुद्ध ॲट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्व आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

रविवारी (दि.१६) रात्री सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास शुभम रूपचंद कांबळे हा युवक (स्कुटी क्रमांक एमएच २३ बीके ५१९३) मुख्य रस्त्यावरून जात असताना रवि कु-हाडे याने त्याच्या स्कुटीला कट मारल्याचे सांगितले जाते. याबाबत शुभमने विचारणा केली असता, आरोपीने त्याला जातीवाचक शिवीगाळ करत स्कुटीला पाठीमागून धडक दिली. त्यानंतर शुभमला खाली पाडून रवि कु-हाडे व लक्ष्मण शिंदे यांनी इतरांना बोलावून मारहाण केल्याचा आरोप आहे.

दरम्यान, शुभम तेथून निघून जाण्याचा प्रयत्न करत असताना विशाल चव्हाण, विलास चव्हाण व राहुल चव्हाण यांनी त्याला पकडून ठेवले. त्यावेळी रवि कु-हाडे याने गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप फिर्यादीत नमूद आहे. तसेच लक्ष्मण शिंदे यांनी छाती, पोट व इतर अवघड जागी लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.

घटनेदरम्यान शुभमचे वडील रूपचंद कांबळे घटनास्थळी आले असता त्यांनाही जातीवाचक शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा आरोप आहे.

या प्रकरणी शुभम रूपचंद कांबळे व रूपचंद साधोजी कांबळे यांच्या फिर्यादीवरून रवि मारोती कु-हाडे, विशाल नागोराव चव्हाण, विलास नागोराव चव्हाण, राहुल नागोराव चव्हाण व लक्ष्मण भगवान शिंदे (सर्व रा. वडारवाडा, माजलगाव) यांच्याविरुद्ध ॲट्रॉसिटी ॲक्ट तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी माजलगाव शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेचा पुढील तपास पोलीस उपअधीक्षक अनिल कटके व सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद मुंडे करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT