Beed Majalgaon Encroachment Removal
माजलगाव: माजलगाव शहरातील वाढत्या अतिक्रमणाच्या समस्येवर अखेर प्रशासनाने ठोस पाऊल उचलत अतिक्रमण हटाव मोहिमेला सुरुवात केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे महापुरुष स्मारक बचाव समितीचे सचिन कराळे आणि किशोर कानडे यांनी केलेल्या उपोषणानंतर नगरपालिका प्रशासन तसेच आमदार प्रकाश सोळंके यांनी दिलेल्या आश्वासनाची अंमलबजावणी गुरुवारपासून (दि.६) सुरू झाली.
शहरातील प्रमुख रस्ते, चौक आणि सार्वजनिक ठिकाणी झालेल्या अतिक्रमणामुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत असून नागरिकांमध्ये संतापाची भावना होती. या पार्श्वभूमीवर महापुरुष स्मारक बचाव समितीने उपोषणाचा मार्ग स्वीकारला होता. उपोषणाची गंभीर दखल घेत प्रशासनाने तातडीने कारवाईचे आश्वासन दिले होते.
त्या अनुषंगाने गुरुवारी सकाळपासून नगरपालिका कर्मचाऱ्यांनी संबंधित विभागांच्या सहकार्याने अतिक्रमण हटविण्याची मोहीम राबविली. या कारवाईत अनेक ठिकाणांवरील अनधिकृत बांधकामे आणि रस्त्यांवरील अतिक्रमणे हटविण्यात आली. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता.
प्रशासनाने दिलेल्या शब्दाप्रमाणे कारवाई सुरू केल्याने उपोषणकर्ते आणि नागरिकांनी समाधान व्यक्त केले. मात्र, ही मोहीम केवळ एकदाच न राबविता सातत्याने सुरू ठेवावी, तसेच भविष्यात नव्याने अतिक्रमण होऊ नये यासाठी कठोर आणि प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आली.
शहर अतिक्रमणमुक्त, सुरक्षित आणि सुबक बनविण्यासाठी प्रशासनाने नियमितपणे अशा कारवाया राबवाव्यात, अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिकांकडून व्यक्त होत आहे.