Beed Leopard : धारुर तालुक्यातील घागरवाडा परिसरात बिबट्याचा वावर; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण! 
बीड

Beed Leopard : धारुर तालुक्यातील घागरवाडा परिसरात बिबट्याचा वावर; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण!

चारदरी परिसरात वासरावर हल्ला करून ठार; घागरवाडा येथे बिबट्याचे दर्शन छायाचित्रात कैद

पुढारी वृत्तसेवा

धारूर : धारूर तालुक्यातील घागरवाडा परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे समोर आले असून, यामुळे परिसरातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ५ ऑक्टोबर रोजी चारदरी परिसरात बिबट्याने वासरावर हल्ला करून त्याला ठार केले होते. त्यानंतर ९ ऑक्टोबर रोजी घागरवाडा परिसरात बिबट्या दिसून आल्याची माहिती समोर आली असून, त्याचे छायाचित्रही कैद करण्यात आले आहे. या घटनांमुळे परिसरातील नागरिक आणि शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

धारूर तालुक्यात सध्या दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून, शेतकरी आणि पशुपालक विविध संकटांचा सामना करीत आहेत. अशातच घागरवाडा आणि चारदरी परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे निदर्शनास आल्याने शेतात कामासाठी जाणाऱ्या शेतकऱ्यांसह पशुपालकांमध्ये भीती वाढली आहे. शेतशिवारात जनावरे चारण्यासाठी नेणाऱ्या नागरिकांना विशेष खबरदारी घ्यावी लागत आहे.

५ ऑक्टोबर रोजी चारदरी परिसरात बिबट्याने वासरावर हल्ला करून त्याला ठार केल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर ९ ऑक्टोबर रोजी घागरवाडा परिसरात बिबट्या दिसल्याचे सांगण्यात आले. या वेळी घागरवाडा येथे संतोष महादेव नागरगोजे यांने दुपारी 1:00 बाभळीच्या झाडावर बसला असता,आपल्या मोबाईलने अत्यंत जवळून व्हिडिओत कैद केला.

याची माहिती नितीन नागरगोजे यांनी दिली.बिबट्याचे छायाचित्र कैद झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये चर्चेला उधाण आले आहे. बिबट्याच्या वावराबाबत वनविभागाने तातडीने पाहणी करून परिस्थितीची खातरजमा करावी, अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे. या संदर्भात वनविभागाचे अधिकारी ईश्वर गुनावत यांच्याशी संपर्क साधला असता, घागरवाडा परिसरातील बिबट्याच्या वावराबाबत शहानिशा करण्यात येईल. तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, ग्रामस्थांनी घाबरून न जाता सतर्क राहावे. विशेषतः लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांनी एकटे बाहेर जाणे टाळावे. शेतात किंवा शेतशिवारात जाताना शक्यतो समूहाने जावे. बिबट्या दिसल्यास त्याच्या जवळ जाण्याचा, त्याला घेरण्याचा किंवा त्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न करू नये. बिबट्याच्या हालचालींची माहिती तातडीने वनविभागाला द्यावी, असे आवाहन वनाधिकारी ईश्वर गुनावत यांनी केले आहे. वनविभागाने परिसरात पाहणी करून आवश्यक उपाययोजना कराव्यात आणि ग्रामस्थांना सुरक्षिततेबाबत मार्गदर्शन करावे, अशी मागणी परिसरातून होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT