गौतम बचुटे
केज : न्यायालयाचा अंतिम हुकूमनामा झालेला असतानाही अतिक्रमण हटविण्याची कारवाई झालेली नाही. मोजणीस पोलिस संरक्षण न दिल्याने भुखंड ताब्यात मिळत नसल्याने केज येथील लांडगे कुटुंबीय मुला बाळांसाह केज तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसले आहेत.
या बाबतची माहिती अशी की, केज येथील विष्णू श्रीमंत लांडगे यांच्यासह त्यांच्या पाच भावांना सर्व्हे नंबर ३०/१ आणि ३०/२ मा. दिवाणी न्यायालय क स्तर केज यांचेकडील दिवाणी दावा क्र. ७५/२०२४ मधील अंतिम हुकूमनामा (कोर्ट डिक्री) आधारे वाटुन आलेल्या मिळकतीची महसुल अभिलेख्याला नोंद घेण्यात आली आहे. त्या वाटणीपत्रा आधारे त्यांच्या पाच वारसांना वाटुन आलेल्या मिळकतीचा वाटप तक्ता हा जमिनीची मोजणी करुन तयार करण्याकामी तहसीलदार यांच्या कार्यालयाने दि. १३ मार्च २०२५ रोजी भुमी अभिलेख कार्यालय केज, यांना आदेशीत केले आहे. त्या जमिनीची रीतसर मोजणी करण्यासाठी ८ डिसेंबर २०२५ रोजी मोजणीसाठी तारीख नेमुन देण्यात आली होती.
मोजणी करतेवेळी पोलीस संरक्षण व बंदोबस्त देण्याची विनंती केली होती. परंतु त्या जमिनीवर अतिक्रमण करणाऱ्यांनी मोजणी करण्यास मज्जाव केला सदर अतिक्रमण हटवुन त्या मिळकतीची मोजणी करुन अहवाला नुसार चतुःसिमा ठरवुन देण्यात यावी. या मागणीसाठी विष्णू लांडगे यांच्या कुटुंबातील महिला व लहान मुले उपोषणाला बसले आहेत. चार दिवसापासून सुरू असलेल्या उपोषणात तीन महिन्याची गरोदर माता, वृद्ध व्यक्ती आणि लहान मुलांचा समावेश आहे.