बीड : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या बीडमधील सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्ग भूसंपादन घोटाळा प्रकरणात तपासाला आता वेग येणार आहे. या प्रकरणातील महत्त्वाचे साक्षीदार आणि तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी आपला सविस्तर लेखी जबाब विशेष तपास पथकाकडे सादर केला आहे. त्यामुळे तपासाची दिशा अधिक स्पष्ट होणार असून, लवकरच यातील मुख्य सूत्रधारांच्या मुसक्या आवळल्या जाण्याची शक्यता आहे.
सोलापूर-धुळे महामार्गाच्या भूसंपादनात मोठा आर्थिक घोटाळा झाल्याचे महसूल विभागाच्या चौकशीत उघड झाले होते. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी संगनमत करून शासनाचे तब्बल 73 कोटी रुपये अधिकचा मावेजा (मोबदला) म्हणून लाटले. तसेच आणखी 243 कोटी रुपयांचे बोगस प्रस्ताव मंजुरीसाठी सादर केले होते. या घोटाळ्यात तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांची बनावट सही वापरल्याचा गंभीर प्रकार तपासात समोर आला होता.
या पार्श्वभूमीवर, पोलिसांनी पाठक यांचा प्राथमिक जबाब नोंदवला होता. त्यानंतर आता 7 जानेवारी रोजी पाठक यांनी स्वतः उपस्थित राहून आपला सविस्तर लेखी जबाब एसआयटीकडे सुपूर्द केला आहे. त्यांच्या या जबाबामुळे घोटाळ्यातील अनेक तांत्रिक बाबी आणि बनावटगिरीचे पुरावे समोर येण्यास मदत होणार आहे. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या या गुन्ह्यात आतापर्यंत तीन आरोपींना अटक करण्यात आली असून ते न्यायालयीन कोठडीत आहेत. तर इतर तीन आरोपींना न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला आहे.
कोषागार अधिकारीही रडारवर
कोट्यवधी रुपयांचा निधी वितरीत करताना शासकीय नियमांचे पालन झाले की नाही, हे तपासण्यासाठी एसआयटीने आता बीडचे कोषागार अधिकारी यांच्याकडे मोर्चा वळवला आहे. यापूर्वी त्यांची एकदा चौकशी करण्यात आली होती. आता पुन्हा एकदा त्यांना सखोल चौकशीसाठी बोलावले जाणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.