Kej Revenue Officer bribery
केज : तालुक्यातील दहिफळ वडमाउली येथे ग्राम महसूल अधिकाऱ्याला लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. वारस नोंद फेरफारसाठी तब्बल ३९ हजार रुपयांची मागणी केल्याचा आरोप असून तडजोडीनंतर ३५ हजारांवर व्यवहार ठरला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, परमेश्वर राऊत (ग्राम महसूल अधिकारी) यांनी पिराची वाडी येथील एका शेतकऱ्याकडून वारसाचा फेर घेण्यासाठी ३९ हजार रुपयांची लाच मागितली होती. तडजोडीनंतर ही रक्कम ३५ हजारांवर ठरली. मात्र संबंधित शेतकऱ्याने लाच देण्यास नकार देत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला.
त्याअनुसार बुधवारी (दि. ८) सापळा रचण्यात आला. दहिफळ वडमाउली येथे लाच स्वीकारताना अधिकाऱ्याला रंगेहात पकडण्यात आले. या कारवाईत सहाय्यक पोलीस उपअधीक्षक सोपान चित्तमपल्ले, पोलीस निरीक्षक बीडकर, सुरवसे व पुरी यांचा सहभाग होता.
या प्रकरणामुळे महसूल विभागातील भ्रष्टाचार पुन्हा एकदा उघडकीस आला असून, पुढील तपास सुरू आहे.
लाच घेताना पकडले गेलेले परमेश्वर राऊत हे पूर्वी संरक्षण सेवेत कार्यरत होते. निवृत्तीनंतर त्यांनी महसूल विभागात ग्राम महसूल अधिकारी म्हणून नोकरी स्वीकारली होती. मात्र, सेवेत आल्यानंतर लाचेच्या प्रकरणात अडकून त्यांची प्रतिमा मलीन झाली आहे.