Kej taluka Sexual harassment case
केज : अल्पवयीन मुलगी घरात एकटीच झोपलेली असताना तिच्या मोठ्या बहिणीचा नवरा रात्री गुपचूप घरात शिरून तिचा विनयभंग केला. त्यानंतर तिचा गळा दाबून जीवे मारण्याची धमकी दिल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या प्रकरणी दाजी आणि त्याच्या आईविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दि. २ सप्टेंबर रोजी रात्री १४ वर्ष वयाची अल्पवयीन मुलीचे आई-वडील व भाऊ हे घराच्या अंगणात झोपले होते. तर मुलगी घराचे दार उघडे ठेवून घरात झोपलेली होती. दरम्यान, रात्री सर्वजण झोपलेले असताना रात्री १०:३० वाजण्याच्या सुमारास त्या अल्पवयीन मुलीच्या मोठ्या बहिणीचा नवरा घरात शिरला आणि त्याने तिचा विनयभंग केला. तिने विरोध केला आणि आरडा ओरड करण्याचे म्हणताच त्याने गळा दाबून जीवे मारण्याची धमकी देवून घरातून पसार झाला.
पीडित अल्पवयीन मुलीच्या आईच्या तक्रारी वरून दाजीविरुद्ध आणि त्याच्या आई विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंक पथकाचे पोलिस उपनिरीक्षक प्रकाश शेळके हे तपास करीत आहेत.
अल्पवयीन मुलगी ही सकाळी उठल्या नंतर रडत होती. म्हणून तिला रडण्याचे कारण विचारले असता तिने रात्री तिच्यावर झालेल्या अत्याचाराची माहिती आईला दिली.
अल्पवयीन मुलीच्या मोठ्या बहिणीचे लग्न एक वर्षापूर्वी झालेले आहे, परंतु पती-पत्नीत मतभेद झाल्याने ती मागील नऊ महिन्यांपासून आई-वडिलांकडे माहेरी राहत आहे.
या झालेल्या घटने संदर्भात अल्पवयीन मुलीने तिच्या आई वडिलांना माहिती दिल्या नंतर आई वडील जावयाच्या घरी गेले आणि त्यांनी जाब विचारला असता त्याने तो मी नव्हेच, अशी भूमिका घेतली आणि तुम्ही माझ्या मुलावर आरोप करीत आहात, असे म्हणून त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली.