Kej Grandmother killed
केज : नातवाने काठीने केलेल्या मारहाणीत आजी गंभीर जखमी झाली. उपचारादरम्यान आजीचा मृत्यू झाला. ही खळबळजनक घटना केज तालुक्यातील सोनीजवळा येथे घडली आहे. या प्रकरणी युसुफवडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की, दि. १५ नोव्हेंबर रोजी सोनीजवळा (ता. केज) येथे रामदास पांडुरंग गवळी (वय २८) याने आजी पंचफुला रामकिसन गवळी (वय ६८ ) यांना काठीने मारहाण केली. त्यात त्या गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांना स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय अंबाजोगाई येथे दाखल करण्यात आले होते.
दरम्यान, शुक्रवारी (दि. २१) सायंकाळी त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी नातू रामदास पांडुरंग गवळी याला युसुफवडगाव पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक मच्छिंद्रनाथ शेंडगे हे अधिक तपास करीत आहेत.
रामदास गवळी मनोरुग्ण असल्याची माहिती :
पंचफुला गवळी यांना मारहाण करणारा त्यांचा नातू रामदास गवळी हा मनोरुग्ण असल्याची माहिती मिळत असून तो विवाहित आहे.