केज येथे काढलेल्या मोर्चात विविध समाजबांधव आणि नागरिक सहभागी झाले होते. Pudhari
बीड

Vilas Ghule Murder Case | केजमध्ये विलास घुले हत्या प्रकरणी मोर्चा; खा. बजरंग सोनवणे यांच्या पुत्राला अटक करा

ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांची पोलिस प्रशासनावर टीका

पुढारी वृत्तसेवा

Beed Kaij Protest March

केज : बीड जिल्ह्यातील टाकळी येथील विलास घुले हत्या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करावी, तसेच पुरवणी जबाबात नाव आल्याचा दावा करण्यात आलेल्या खासदार बजरंग सोनवणे यांचे सुपुत्र गौरव सोनवणे यांना अटक करावी, या मागण्यांसाठी शुक्रवारी (दि. १०) केज येथे मोर्चा काढण्यात आला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून छत्रपती शिवाजी महाराज पुतळा मार्गे तहसील कार्यालयापर्यंत काढण्यात आलेल्या या मोर्चात विविध समाजबांधव आणि नागरिक सहभागी झाले होते.

मोर्चादरम्यान ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पोलिस प्रशासनावर टीका केली. विलास घुले हे ओबीसी समाजातील तरुण असल्याने या प्रकरणात अपेक्षित गतीने कारवाई होत नसल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच पुरवणी जबाबात नाव आल्याचा दावा करण्यात आलेल्या गौरव सोनवणे यांच्याविरुद्ध अद्याप कारवाई का करण्यात आली नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

यावेळी बोलताना वाघमारे यांनी, "खा. बजरंग सोनवणे भविष्यात भाजपमध्ये प्रवेश करतील, या शक्यतेमुळे मुख्यमंत्री संबंधितांवर कारवाई करण्यास धजावत नसावेत," असा आरोप केला. मात्र, या आरोपांबाबत मुख्यमंत्री, भाजप किंवा खासदार बजरंग सोनवणे यांची अधिकृत प्रतिक्रिया वृत्त लिहिपर्यंत प्राप्त झाली नव्हती.

उल्लेखनीय म्हणजे, १० जुलै रोजी टाकळी येथे हॉटेलवर सुरू असलेले भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या विलास घुले यांच्यावर चाकूने हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणातील आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात यावी, प्रकरणाची सुनावणी फास्ट ट्रॅक न्यायालयात व्हावी, मयताच्या पत्नीला शासकीय नोकरी द्यावी तसेच फिर्यादी रमेश घुले यांना शस्त्रधारी पोलिस संरक्षण देण्यात यावे, अशा प्रमुख मागण्या मोर्चेकऱ्यांनी केल्या.

या मोर्चामध्ये ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांच्यासह मृत विलास घुले यांच्या पत्नी विलास घुले यांचे भाऊ रमेश घुले आणि समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. तसेच यावेळी पोलिसांचा मोठा पाऊस फाटा देखील तैनात करण्यात आलेला होता.

मुख्यमंत्री जात पाहून कारवाई करीत आहेत. आता यापुढे आम्ही राज्यात मोर्चे काढून सरकारला जाब विचारू.
- नवनाथ वाघमारे, ओबीसी नेते
माझा भाऊ विलास घुले याने जखमी अवस्थेत मला आरोपीला वाचविण्यासाठी कोणी कोणी मदत केली. याची माहिती दिली होती. म्हणून विलास घुले यांच्या खून प्रकरणातील सर्व आरोपी विरुद्ध कारवाई करण्यात यावी.
- रमेश घुले, फिर्यादी तथा मृताचा भाऊ

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT