kej police station complainants clash
केज : मारहाणीची तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात आलेल्या तक्रारदारासह दुसऱ्या गटातील व्यक्तींमध्ये कर्तव्यावर असलेल्या पोलिस अधिकाऱ्यांसमोरच झोंबाझोंबी झाली. या वेळी एका व्यक्तीने पोलीस ठाण्यातील खुर्ची उचलून दुसऱ्या महिलेच्या डोक्यात मारण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने खुर्ची हिसकावून घेण्यात आली. या प्रकरणी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना १२ ऑक्टोबर रोजी रात्री सुमारे ११.४५ वाजता केज पोलीस ठाण्यात घडली. त्या वेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश क्षीरसागर, पोलीस उपनिरीक्षक राजू वाघमारे, पोलीस हेडकॉन्स्टेबल बाळासाहेब अहंकारे तसेच महिला पोलीस कॉन्स्टेबल तरकसे आणि सांगळे कर्तव्यावर उपस्थित होते.
कोल्हेवाडी (ता. केज) येथील महादेव प्रकाश आघाव (वय २६) हे आपल्याला झालेल्या मारहाणीची तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात आले होते. त्यांना वैद्यकीय उपचारासाठी पत्र देण्याची प्रक्रिया सुरू असतानाच केज येथील जलाल नगर परिसरात राहणाऱ्या अर्चना प्रकाश आघाव, लता प्रकाश आघाव आणि संगीता बाळू नेहरकर या तेथे आल्या. त्यांनी महादेव आघाव यांना मोठमोठ्याने शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
यामुळे वाद वाढला. महादेव आघाव यांनी पोलीस ठाण्यातील खुर्ची उचलून अर्चना आघाव यांना मारण्यासाठी उगारली. मात्र, तेथे उपस्थित असलेल्या पोलीस हेडकॉन्स्टेबल बाळासाहेब अहंकारे यांनी तत्काळ हस्तक्षेप करून त्यांच्या हातातील खुर्ची हिसकावून घेतली. त्यानंतर दोन्ही गटांमध्ये झोंबाझोंबी झाली.
पोलीस ठाण्यातच पोलिसांसमोर घडलेल्या या प्रकाराची पोलिसांनी गंभीर दखल घेतली. पोलीस उपनिरीक्षक राजू वाघमारे यांच्या तक्रारीवरून महादेव प्रकाश आघाव, अर्चना प्रकाश आघाव, लता प्रकाश आघाव आणि संगीता बाळू नेहरकर या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल राम पवार या प्रकरणाचा तपास करीत आहेत.