mother and son assaulted Kej Nandurghat
केज : केज तालुक्यातील नांदूरघाट येथे शेताच्या बांधालगत ऊस लागवडीच्या कारणावरून माय-लेकावर मारहाण करण्यात आल्याची घटना घडली. या मारहाणीत महिलेच्या तोंडावर दगड लागल्याने तिचा एक दात पडल्याची माहिती समोर आली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, नांदूरघाट येथील बाळू उर्फ राम शिवदास जाधव (वय २५) व त्यांची आई सुशीला जाधव हे १० मार्च रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास शेतात ऊस लागवड करत होते. बांधाच्या कडेला ऊस लावल्याच्या कारणावरून लक्ष्मण रामराव जाधव, पुष्पा लक्ष्मण जाधव, सतीश लक्ष्मण जाधव व संजय लक्ष्मण जाधव या चौघांनी त्यांच्याशी वाद घालत शिवीगाळ केली.
यानंतर त्यांनी बाळू जाधव यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. हा वाद सोडवण्यासाठी सुशीला जाधव पुढे आल्या असता त्यांनाही खाली पाडून पोटात व पाठीत बुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. यावेळी सतीश जाधव याने त्यांच्या तोंडावर दगड मारल्याने त्यांचा एक दात पडला असून दुसरा दात हलत असल्याचे तक्रारीत नमूद आहे.
या प्रकरणी बाळू जाधव यांच्या तक्रारीवरून केज पोलीस ठाण्यात लक्ष्मण जाधव, पुष्पा जाधव, सतीश जाधव व संजय जाधव या चौघांविरुद्ध गुन्हा क्रमांक १२५/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ११५(२), ११७(२), ३५१(२), ३५२ व ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास जमादार राजू वंजारे करत आहेत.