Kej Missing Woman Case
केज : केज तालुक्यातील एका २८ वर्षीय विवाहित महिलेच्या बेपत्ता होण्याची घटना समोर आली असून, मोबाईलवर आलेल्या मेसेजवरून झालेल्या वादानंतर ती घरातून निघून गेल्याची माहिती आहे. या प्रकरणी केज पोलिस ठाणे येथे हरवल्याची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जाधववाडी परिसरातील एक युवक पिकअप वाहन चालवून व शेती करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. १ मे रोजी तो कामावरून घरी आल्यानंतर त्याला पत्नीच्या मोबाईलचा टॉर्च सुरू असल्याचे दिसले. त्याने मोबाईल तपासला असता एका अज्ञात क्रमांकावरून इंग्रजीत मेसेज आढळून आला. यावरून त्याने पत्नीला त्या मेसेजबाबत विचारणा करत नाराजी व्यक्त केली. त्यानंतर दोघांनी जेवण करून झोप घेतली.
दुसऱ्या दिवशी (२ मे) पहाटे पती उठला असता पत्नी घरात नसल्याचे त्याच्या लक्षात आले. तिने कुणालाही न सांगता घर सोडले असल्याने तिचा परिसरात व नातेवाईकांकडे शोध घेण्यात आला, मात्र काहीही माहिती मिळाली नाही.
बेपत्ता महिलेचे वय २८ वर्षे असून उंची सुमारे ४ फूट ८ इंच, रंग गोरा, बांधा मजबूत व चेहरा गोल आहे. ती काळ्या रंगाची साडी व ब्लाऊज परिधान केलेली होती आणि मराठी भाषा बोलते, अशी माहिती पोलिसांनी दिली.
या घटनेनंतर पतीच्या तक्रारीवरून केज पोलिसांनी हरवल्याची नोंद केली असून पुढील तपास हेड कॉन्स्टेबल फुलचंद सानप करीत आहेत.