केज :- उपजिल्हा रुग्णालय केज येथे औषधांचा तुटवडा निर्माण झाला असून त्यामुळे रुग्ण व नातेवाईकांना बाहेरून औषध विकत घ्यावे लागत असल्याने आरोग्य सेवा आणि आरोग्य विभाग यांच्या विरुद्ध जनतेतून रोष व्यक्त होत आहे.
बीड जिल्ह्यातील अत्यंत नावाजलेल्या अशा केज येथील उपजिल्हा रुग्णालयात केज आणि परिसरातील ग्रामीण भागातून उपचारासाठी रुग्ण येत असतात. दररोज सुमारे ६०० ते ६५० अशी दररोजची बाह्य रुग्णांची नोंद या उपजिल्हा रुग्णालयात होत आहे. मात्र येथे येणाऱ्या रुग्णांना साधे खोकल्याचे सिरप देखील उपलब्ध नसते तसेच इंजेक्शन्स, औषध आणि सलाईनची सुई, सिरिंज, स्टिकिंग टेप देखील बाहेरून विकत घ्यावे लागत आहे.
त्यामुळे औषध वाटप विभागातील कर्मचारी आणि रुग्ण व त्यांचे नातेवाईक यांच्यात भांडण व संघर्ष होण्याच्या घटना घडत आहे. येथील औषधी विभागाच्या एका कर्मचाऱ्याने प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले की, केज येथील उपजिल्हा रुग्णालयात येणाऱ्या रुग्संख्येच्या सरासरीपेक्षा अत्यंत कमी प्रमाणात औषध पुरवठा होत असल्याने रूग्णांना अडचणी निर्माण होत असून त्यांना नाहक खर्च आणि भुर्दंड सहन करावा लागत आहे
" येथे उपचारासाठी येणारे रुग्ण हे सामान्य परिस्थितील असतात. त्यामुळे जर औषधांच्या तुटवड्याची समस्या सुटली नाही. तर आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू. "प्रा. हनुमंत भोसले, केज विकास संघर्ष समिती