गौतम बचुटे
केज : केज शहरातील धारूर रोडवरील जय भवानी चौकात टिप्परच्या धडकेत एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर या अपघाताला कारणीभूत असलेला चौकातील चबुतऱ्याचा भाग अखेर हटविण्यात आला. प्रशासनाकडून कोणतीही कारवाई होत नसल्याने केज येथील हास्य क्लबच्या सदस्यांनी पुढाकार घेत जेसीबीच्या साहाय्याने चबुतऱ्याचा भाग जमीनदोस्त केला.
केज शहर व परिसरात वाढत्या अपघातांबाबत नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. रस्ते व चौकांमधील अडथळ्यांमुळे अनेकदा अपघात घडत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. गुरुवार, दि. २३ जुलै रोजी जय भवानी चौकात झालेल्या भीषण अपघातात टिप्पर अंगावरून गेल्याने नितीन चाटे या तरुणाचा जागीच मृत्यू झाला होता. या घटनेनंतर संतप्त झालेल्या नागरिकांनी चौकातील चबुतऱ्याच्या विस्तारित भागामुळे वाहनांना वळण घेताना अडचण निर्माण होत असल्याचा मुद्दा पुन्हा उपस्थित केला.
याच पार्श्वभूमीवर शुक्रवार, दि. २४ जुलै रोजी सायंकाळी सुमारे ५ वाजण्याच्या सुमारास हास्य क्लबच्या सदस्यांनी स्वतः पुढाकार घेत जेसीबीच्या सहाय्याने जय भवानी चौकातील अपघातास कारणीभूत ठरत असल्याचा आरोप असलेला चबुतऱ्याचा विस्तारित भाग हटविला.
जय भवानी चौकातील चबुतऱ्याच्या रचनेमुळे वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याची तक्रार स्थानिक नागरिक आणि वाहनधारकांकडून सातत्याने करण्यात येत होती. याबाबत प्रशासन तसेच लोकप्रतिनिधींना अनेक वेळा निवेदने व तक्रारी देण्यात आल्या होत्या. मात्र त्यावर कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
प्रशासनाकडून कोणतीही कारवाई होत नसल्याने आणि भविष्यात आणखी एखादा निष्पाप नागरिक अपघाताचा बळी ठरू नये, या उद्देशाने हास्य क्लबच्या सदस्यांनी आक्रमक भूमिका घेत चबुतऱ्याचा धोकादायक भाग हटविण्याचा निर्णय घेतला. या कारवाईनंतर परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त करत चौकात कायमस्वरूपी सुरक्षित वाहतूक व्यवस्था करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे.