बीड

Kej Crime | विलास घुले यांचा मृतदेह केज पोलिस ठाण्यात आणला : खून प्रकरणी केज कडकडीत बंद! तणावपूर्ण परिस्थिती

खासदार पुत्रावर गुन्हा दाखल झाल्या शिवाय अंत्यविधी न करण्याच्या भूमिकेमुळे पोलिस ठाण्यात तणाव, जिल्हा पोलिस अधीक्षक नवनीत काँवत केजमध्ये दाखल

पुढारी वृत्तसेवा

केज : विलास घुले खून प्रकरणी दिवसभर केज शहरात कडकडीत बंद आणि रस्ता रोकोमुळे जिल्ह्यातील वाहतूक व्यवस्था प्रभावित झाली असून जागोजागी वाहने व प्रवाशी अडकून पडले आहेत. तसेच खा. बजरंग सोनवणे यांच्या मुलावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल होत नाही आणि तो पर्यंत मृतदेहावर अंत्यसंस्कार न करण्याच्याची भूमिका घेत विकास घुले यांचा मृतदेह केज पोलिस ठाण्यात ठेवला आहे. या खून प्रकरणातील नऊ आरोपींपैकी मुख्य आरोपीसह एकूण सहा आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून उर्वरित आरोपींचा पोलिस तपास घेत असून पोलिस पथके रवाना झाले आहेत.

दि. २० जून रोजी गावकरी हॉटेलचे मालक विलास घुले हे त्यांचा मित्र उमेश माने याला जमावाकडून मारहाण होत असल्याने त्याला सोडविण्यासाठी गेले होते. यावेळी रामेश्वर गायकवाड याने समर्थ हॉटेल समोर घुले यांच्या पोटात चाकू भोकसला. उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला.

विलास घुले यांच्या खुनामुळे संतप्त झालेल्या नातेवाईक आणि समाज बांधवांनी विलास घुले यांच्या मारेकऱ्यांना ताब्यात घेतले जात नाही आणि या प्रकरणी खा. बजरंग सोनवणे यांचे पुत्र सौरभ सोनवणे यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही तो पर्यंत विलास घुले यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार न करण्याची भूमिका घेतल्याने केज शहरात तणाव परिस्थिती निर्माण झाली आहे.

मंगळवार दि. २४ जून रोजी जमावाने एक रॅली काढून व्यापारी बांधवांनी दुकाने बंद ठेव्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यामुळे केज शहर कडकडीत बंद ठेवण्यात आले. तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौकात रस्ता रोको करण्यात आला. त्या नंतर जमावाने विलास घुले यांचा मतदेह असलेली ॲम्ब्युलन्स केज पोलिस ठाण्या समोर उभी करण्यात आली आहे.

सहा आरोपी अटक

विलास घुले खून प्रकरणी बाबासाहेब गुरुबा कदम, मंगेश गोरख कदम, रामेश्वर गायकवाड, शुभम रामभाऊ गायकवाड. भैय्यासाहेब गायकवाड, अजय उर्फ बंकट कदम, नवनाथ परसराम कदम, दिपक परसराम कदम आणि संतोष नरहरी कदम यांच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आहे. त्यातील मुख्य आरोपी रामेश्वर गायकवाड यांच्यासह सहा आरोपींना ताब्यात घेतले आहे. रात्री उशिरा या सहा आरोपींना न्यायालयार हजर करण्यात येणार आहे.

लक्षण हाके केज मध्ये दाखल :

ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके हे केज मध्ये हजर होत त्यांनी या प्रकरणी खा. बजरंग सोनवणे यांचा मुलगा सौरभ सोनवणे याच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

जिल्हा पोलिस अधीक्षक केज येथे हजर :- जिल्हा पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांनी केज पोलिस ठाण्याला भेट देऊन तपासा संदर्भात मार्गदर्शन केले. दरम्यान विलास घुले यांच्या खुनामुळे संतप्त झालेल्या जमावाने केज पोलिस ठाण्यात पोलिसांच्या विरुद्ध संताप व्यक्त करीत घोषणाबाजी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT