Beed Kej Minor Girl Rape Case
केज : अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवू तिला पळवून नेऊन तिच्या इच्छेविरुद्ध वारंवार बळजबरीने लैंगिक संबंध ठेवल्या प्रकरणी केज सत्र न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवत २० वर्ष कारावास आणि ५५ हजारांचा दंड ठोठावला. या प्रकरणाची सुनावणी सत्र न्यायाधीश कुणाल डी. जाधव यांच्या न्यायालयात झाली.
याबाबतची अधिक माहिती अशी की, १७ जानेवारी २०२२ रोजी केज तालुक्यातील युसुफवडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत १६ वर्ष वयाची अल्पवयीन मुलगी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास पाणी भरण्यासाठी गेली असता तिला लग्नाचे आमिष दाखवून आरोपी शकील महंमद मुलानी (रा. दुधगाव, ता. जि. धाराशिव) याने तिला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेले होते.
या प्रकरणी पीडित मुलीच्या भावाच्या तक्रारी वरून आरोपी विरुद्ध युसुफवडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ. संदीप दहीफळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक पिंपळे हे तपास करीत होते.
तपासा दरम्यान पीडितेचा शोध घेतला असता पीडिता ही जामगाव येथे आरोपी शकील महम्मद मुलानी याच्यासोबत मिळून आली. पीडितेकडे विचारपूस केली असता दि. १७ जानेवारी २०२२ रोजी आरोपीने पीडितेस लग्नाचे आमिष दाखवून तिला कर्नाटक राज्यातील लोकापूर, त्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील सापटने (ता. माढा) येथे वीटभट्टीवर तसेच जामगाव (ता. बार्शी) येथील वीटभटटीवर नेले. तेथे तिच्या सोबत तिची संमती नसताना शारीरिक संबंध ठेवले.
या प्रकरणी बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करून सत्र न्यायालय केज येथे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. आरोपी विरूध्द गुन्हा सिध्द करण्यासाठी सरकारी पक्षातर्फे एकूण ७ साक्षीदार तपासण्यात आले.
या प्रकरणात सहाय्यक सरकारी वकिल ॲड. राम बी. बिरंगळ यांनी काम पाहिले. त्यांना सहाय्यक सरकारी वकिल ॲड. आर. पी. उदार आणि ॲड. सचिन चौधरी यांनी सहकार्य केले. तसेच त्यांना पैरवी अधिकरी महिला पोलीस नाईक राणी बनसोडे यांनी सहकार्य केले.