Kej Court Verdict ST Bus Stone Pelting
केज : बसवर दगडफेक करताना पकडलेल्या आरोपीने पोलिसांवर हल्ला करून चावा घेतल्याच्या प्रकरणात न्यायालयाने महत्त्वाचा निकाल दिला आहे. मस्साजोग येथील प्रवीण श्रीधरराव देशमुख याला एक वर्षाची शिक्षा व दोन हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला असून, सहआरोपी रवींद्र जालिंदर देशमुख याची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
ही घटना ३ ऑगस्ट २०१८ रोजी घडली होती. छत्रपती संभाजीनगर आगाराची शिवशाही बस लातूरहून छत्रपती संभाजीनगरकडे जात असताना दुपारी मस्साजोग येथे प्रवासी घेण्यासाठी थांबली होती. यावेळी मद्यधुंद अवस्थेत आलेल्या प्रवीण देशमुख आणि रवींद्र देशमुख यांनी बसवर दगडफेक करत समोरील काचा फोडल्या. या घटनेत बसचे सुमारे ४० हजार रुपयांचे नुकसान झाले होते.
दरम्यान, पेट्रोलिंग करत असलेल्या केज पोलीस ठाण्याच्या गुप्तचर विभागातील पोलीस कर्मचारी परमेश्वर वखरे आणि पोलीस नाईक अशोक गवळी यांनी घटनास्थळी धाव घेत आरोपी प्रवीण देशमुख याला पकडले. मात्र, पोलिसांच्या तावडीतून सुटका करून घेण्याच्या प्रयत्नात त्याने धक्काबुक्की करत परमेश्वर वखरे यांच्या गालाला तसेच पोलीस गाडीत बसवल्यानंतर अशोक गवळी यांच्या हाताला चावा घेतला. या प्रकारात दोन्ही पोलीस कर्मचारी जखमी झाले होते.
या प्रकरणी परमेश्वर वखरे यांच्या फिर्यादीवरून दोन्ही आरोपींविरुद्ध केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सहाय्यक पोलीस निरीक्षक श्यामकुमार डोंगरे यांनी तपास पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
केज येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाच्या न्यायाधीश श्रीमती आर. के. शेख यांच्या समोर १० एप्रिल रोजी अंतिम सुनावणी झाली. प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांसह एकूण आठ साक्षीदारांचे जबाब आणि सहाय्यक सरकारी वकील ॲड. रविकुमार उदार यांनी मांडलेला युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायालयाने प्रवीण देशमुख याला शिक्षा सुनावली.
सरकारी पक्षातर्फे ॲड. रविकुमार उदार यांनी काम पाहिले, तर ॲड. राम बिरंगळ यांनी त्यांना सहकार्य केले. या प्रकरणात पैरवी अधिकारी म्हणून पोलीस नाईक रमा भालेराव यांनी काम पाहिले.