Beed Kej Motorcycle Crash
केज : केज येथील आनंदनगरी मध्ये असलेल्या 'मौत का कुवा' या थरारक खेळात दोन भरधाव मोटार सायकलींची जोरदार धडक झाली. यात दोघे गंभीर जखमी झाले. दोघांनाही उपचारासाठी अंबाजोगाई येथे हलविले आहे. केज येथील राजमुद्रा गणेश मंडळा समोर पंचायत समितीच्या ग्राऊंडवर दरवर्षी आनंद नगरी असते. रहाट पाळणे, रेल्वे, फराळाची दुकाने आणि खेळणी व मनोरंजनाच्या खेळा सोबतच थरारक खेळ खेळले जातात.
सोमवारी (दि.८) आनंद नगरी मध्ये असलेल्या मौत का कुवा मध्ये दोन मोटरसायकल स्वार हे भरधाव वेगाने मोटार सायकली चालवून काळजाचा ठोका चुकवून विविध कसरती करून प्रेक्षकांची मने जिंकून घेत असताना अचानक लक्ष विचलित झाले. त्या दोन मोटार सायकलींची जोराची धडक झाली. यात दोघे मोटार सायकल स्वार जखमी झाले आहेत. जखमींना केज येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, ते गंभीर जखमी असताना तत्काळ त्यांना अंबाजोगाई येथे हलविले असल्याची माहिती उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. दत्तात्रय केंद्रे यांनी दिली.
या अपघाताबाबत अद्याप पोलिसांकडे माहिती उपलब्ध नसली तर सदर अपघाताची माहिती मिळाल्याची माहिती पोलिस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांनी दिली आहे. या अपघाताची माहिती पोलिस जमादार बाळासाहेब अहंकारे आणि पोलिस जमादार शिवाजी कागदे हे घेत आहेत. जखमीपैकी एकाची प्रकृती गंभीर असून एकाची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलिस जमादार शिवाजी कागदे यांनी दिली.