Kej Ambajogai Road Tempo Car Crash
केज : केज-अंबाजोगाई मार्गावरील ढाकेफळ शिवारात भरधाव टेम्पोने कारला जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात कार चालक गंभीर जखमी झाला आहे. ही घटना २४ मे रोजी मध्यरात्री घडली.
केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील प्रणव सचिन देशमुख हे आपल्या कारने (एमएच-२४/एएफ-१३०८) नातेवाईकांना भेटण्यासाठी लातूर येथे गेले होते. ते परत केजकडे येत असताना मध्यरात्री १ ते १.३० वाजण्याच्या सुमारास ढाकेफळ शिवारातील दाजीबा हॉटेलसमोर भरधाव वेगाने येणाऱ्या टेम्पोने (एमएच-४१/एयू-८३५८) त्यांच्या कारला समोरून जोरदार धडक दिली.
या अपघातात प्रणव देशमुख यांच्या डोक्याला, मांडीला व खांद्याला गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर त्यांना तातडीने अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी त्यांना लातूर येथील हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले आहे. सध्या ते बेशुद्ध अवस्थेत असल्याची माहिती मिळाली आहे.
अपघातात कारच्या समोरील भागाचे मोठे नुकसान झाले असून अपघातानंतर टेम्पो चालक घटनास्थळावरून फरार झाला. या प्रकरणी जितेंद्र विजयसिंह देशमुख यांच्या फिर्यादीवरून संबंधित टेम्पो चालकाविरुद्ध युसुफवडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेचा पुढील तपास जमादार केशव खाडे करीत आहेत.