स्मशानभूमीच्या नावाखाली निधी मिळवून रस्ता तयार करण्यात आला. 
बीड

Beed News| स्मशानभूमी नाही मग 'त्या' नावाखाली रस्ता कसा? ११ लाखांच्या घोटाळ्याने बोबडेवाडीत खळबळ

माजी सरपंचाचा खळबळजनक आरोपानंतर प्रशासकीय यंत्रणेचे धाबे दणाणले

पुढारी वृत्तसेवा

केज : तालुक्यातील बोबडेवाडी येथे प्रत्यक्षात कोणतीही सार्वजनिक स्मशानभूमी अस्तित्वात नसताना ती कागदोपत्री दाखवून जनसुविधा योजनेअंतर्गत तब्बल ११ लाख रुपयांचा सिमेंट रस्ता बांधण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. हा निधी कसा मंजूर झाला आणि घाईगडबडीत रस्ता कसा तयार करण्यात आला, असा थेट सवाल उपस्थित करत बोबडेवाडीचे माजी सरपंच संतोष क्षिरसागर यांनी यासंदर्भात प्रशासनाकडे गंभीर तक्रार दाखल केली आहे.

माजी सरपंच संतोष क्षिरसागर यांनी दिलेल्या निवेदनानुसार, बोबडेवाडी गावात प्रत्यक्ष पाहणी केल्यास कुठेही सार्वजनिक स्मशानभूमी नाही. मात्र, संबंधित घटकांनी कागदपत्रांवर बनावट माहिती नोंदवून जनसुविधा योजनेअंतर्गत ११ लाख रुपयांचा निधी मंजूर करून घेतला. निधी लाटण्याच्या उद्देशाने हा सिमेंट रस्ता अत्यंत घाईगडबडीत आणि रात्रीच्या वेळी रातोरात बांधून पूर्ण करण्यात आला, असा आरोप क्षीरसागर यांनी केला आहे.

याप्रकरणी क्षिरसागर यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे (CEO) लेखी तक्रार केली आहे. ज्या ठिकाणी ही कथित स्मशानभूमी दाखवून निधी मंजूर करण्यात आला, त्या जागेचा पी.टी.आर. आणि लँड लोकेशनचे अधिकृत पुरावे तसेच छायाचित्रे प्रशासनाने सादर करावीत, अशी मागणी त्यांनी या तक्रारीत केली आहे.

या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी, तहसीलदार, गट विकास अधिकारी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना पाठवण्यात आल्या असून, या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

शासनाच्या निधीचा गैरवापर झालेला असून या कामाची मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी स्वतः चौकशी करुन त्याचे बिल अदा करण्यात येऊ नये. तसेच या बनावट कामाप्रकरणी समाविष्ट असलेल्या भ्रष्ट लोकावर कार्यवाही करण्यात यावी.
संतोष क्षिरसागर, (तक्रारदार, माजी सरपंच)
गावात सार्वजनिक स्मशानभूमीच अस्तित्वात नसताना शासकीय निधीचा गैर प्रकाराची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी.
मोहन बोबडे, ( माजी सरपंच )

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT