Kaij Police Stolen Mobile Recovery
केज : जत्रा, बाजारपेठ तसेच गर्दीच्या ठिकाणांहून गहाळ आणि चोरीला गेलेल्या १४ मोबाईलचा शोध घेऊन केज पोलिसांनी ते मूळ मालकांना परत केले. पोलिसांच्या या कामगिरीमुळे मोबाईल परत मिळण्याची आशा सोडलेल्या नागरिकांच्या चेहऱ्यावर पुन्हा समाधानाचे हास्य फुलले.
केज पोलिस ठाण्याच्या हद्दीत विविध ठिकाणी नागरिकांचे मोबाईल गहाळ झाल्याच्या तसेच चोरीला गेल्याच्या तक्रारी पोलिसांकडे प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींची दखल घेत पोलिस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू करण्यात आला.
पोलिसांच्या डीबी पथकाने केंद्र सरकारच्या सीईआयआर (CEIR) प्रणालीच्या माध्यमातून गहाळ झालेल्या मोबाईलचा तांत्रिक पद्धतीने शोध घेतला. तपासादरम्यान वेगवेगळ्या ठिकाणी वापरात असलेले १४ मोबाईल पोलिसांनी शोधून हस्तगत केले. त्यानंतर संबंधित मोबाईलचे मूळ मालक व वापरकर्त्यांशी संपर्क साधून आवश्यक पडताळणी करण्यात आली. सर्व १४ मोबाईल त्यांच्या मूळ मालकांना परत करण्यात आले.
या कारवाईत जिल्हा पोलिस अधीक्षक नवनीत काँवत, अपर पोलिस अधीक्षक चेतना तिडके आणि सहाय्यक पोलिस अधीक्षक वेंकटराम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक राहुल सूर्यतळ, सहाय्यक पोलिस निरीक्षक लक्ष्मण उंबरे, पोलिस उपनिरीक्षक राजू वाघमारे, पोलिस कॉन्स्टेबल शिवाजी कागदे, नितीन वारे, संतोष गिते आणि नितीन जाधव यांनी सहभाग घेतला.
मोबाईल चोरी अथवा गहाळ झाल्यास नागरिकांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करावी. तक्रारींच्या आधारे तांत्रिक यंत्रणेचा वापर करून चोरीला किंवा गहाळ झालेल्या मोबाईलचा शोध घेण्यास मदत होत असल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे.