Women Harassment Case Pudhari
बीड

Kaij Dowry Case | प्लॉट खरेदीसाठी माहेरून दोन लाखांची मागणी; विवाहितेला घरातून हाकलले

माजलगाव येथे पती, सासू आणि नणंदेविरुद्ध गुन्हा दाखल; विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ

पुढारी वृत्तसेवा

Domestic Violence Beed

केज : प्लॉट खरेदी करण्यासाठी माहेरून दोन लाख रुपये घेऊन येण्याचा तगादा लावत विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याची घटना माजलगाव येथे घडली. पैसे न आणल्याने शिवीगाळ व मारहाण करून विवाहितेला घरातून हाकलून दिल्याप्रकरणी पती, सासू आणि नणंद अशा तिघांविरुद्ध केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुमताज फेरोज शेख (वय २९, रा. केज) असे तक्रारदार विवाहितेचे नाव आहे. तिचा पती फेरोज सिकंदर शेख याने प्लॉट खरेदी करण्यासाठी माहेरून आई-वडिलांकडून दोन लाख रुपये घेऊन येण्याची मागणी केली होती. याच कारणावरून तो मुमताज यांना सतत शिवीगाळ करून मारहाण करीत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

तसेच पती फेरोज शेख, सासू बानू सिकंदर शेख आणि नणंद परवीन सिकंदर शेख (सर्व रा. माजलगाव) यांनी संगनमत करून दोन लाख रुपये आणले नाहीत, तर घरात राहू देणार नाही, अशी धमकी दिल्याचा आरोप आहे. या तिघांनी विवाहितेला चापटाबुक्क्यांनी मारहाण करून शारीरिक व मानसिक त्रास दिला. तसेच उपाशी ठेवून घराबाहेर हाकलून दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

१७ फेब्रुवारी ते २० मे या कालावधीत हा प्रकार घडल्याचे मुमताज शेख यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. या तक्रारीवरून पती फेरोज, सासू बानू आणि नणंद परवीन यांच्याविरुद्ध केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जमादार निर्मला जाधव पुढील तपास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT