कडा: कडा येथील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी गेलेल्या १९ वर्षीय तरुणीला केबिनमध्ये बोलावून तिच्याशी डॉक्टरने गैरवर्तन केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी कडा येथील पटवा हॉस्पिटलमधील डॉ. महेंद्र पटवा याच्याविरुद्ध आष्टी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तीव्र संताप व खळबळ उडाली आहे.
तक्रारीनुसार, कडा येथील एका परिसरातील १९ वर्षीय तरूणीला २९ ऑगस्ट रोजी श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यामुळे ती पालकांसोबत पटवा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी गेली होती. त्यावेळी तिच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी, सकाळी साडेदहाच्या सुमारास, पुन्हा त्रास जाणवू लागल्याने ती पालकांसह पुन्हा हॉस्पिटलमध्ये पोहोचली.
उपचार सुरू असताना डॉ. पटवा याने तिला स्वतःच्या केबिनमध्ये बोलावून घेतले आणि तिच्या आईला बाहेर थांबण्यास सांगितले. त्यानंतर डॉक्टरने अश्लील संवाद साधत तिच्या इच्छेविरुद्ध स्पर्श केल्याचा गंभीर आरोप तरूणीने तक्रारीत केला आहे. तरुणीने विरोध केल्यानंतर बाहेर कोणाला काही सांगू नकोस, अन्यथा बदनामी होईल, अशा स्वरूपाची धमकी दिल्याचाही आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. या प्रकारामुळे घाबरलेल्या तरुणीने हॉस्पिटलमधून बाहेर आल्यानंतर घरी जाऊन आई-वडिलांना घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर तिघांनी पोलिसात धाव घेत डॉक्टरविरोधात आष्टा पोलिसांत गुन्हा दाखल केला.