बीड

बीड : धारूर तालुक्यात ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाच्या वाहनांना मराठा समाजाकडून काळे झेंडे दाखवून निषेध

backup backup

धारूर; पुढारी वृत्तसेवा : बीड जिल्ह्यातील परळी येथे मंगळवारी (दि. ५) शासन आपल्या दारी हा कार्यक्रम मुख्यमंत्री तसेच दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत पार पडला. या कार्यक्रमासाठी सर्वत्र महामंडळाच्या एसटी बस पाठवून नागरिकांना बोलावण्यात आले होते. परंतु धारूर तालुक्यात अनेक ठिकाणी मराठा आंदोलकांनी या गाड्या रिकाम्या परत पाठवल्या, तर काही ठिकाणी मराठा आरक्षणाच्या घोषणाबाजी करण्यात आल्या. काही ठिकाणी काळे झेंडे दाखवून शासन आपल्या दारी या शासनाने चालवलेल्या कार्यक्रमाचा निषेधही व्यक्त करण्यात आला.

मंगळवारी (दि. ५) बीड जिल्ह्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच अजित पवार यांच्या उपस्थितीत पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी परळी येथे शासन आपल्या दारी या कार्यक्रमाचे आयोजन केल होत. आयोजित केलेल्या कार्यक्रमास जिल्हाभरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे यासाठी मोठे प्रयत्न करण्यात आले. जिल्हाभरात महामंडळाच्या माध्यमातून एसटी बस पाठवून लोकांना परळी येथे नेण्यात आले. धारूर तालुक्यातील गावोगावी पाठवलेल्या एसटी बस तालुक्यातील मराठा समाजातील तरुण आंदोलकांनी रिकाम्या परत पाठवल्या. काही ठिकाणी शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली तर काही ठिकाणी काळे झेंडे दाखवून निषेध व्यक्त करण्यात आला. तालुक्यातील खोडस, वाघोली, कोळपिंपरी, पांगरी, आवरगाव अंजनडोह यासह अनेक गावातील मराठा आंदोलकांनी या एसटी बस परत पाठवल्या. आवरगाव येथे तर काळे झेंडे दाखवून शासनाचा निषेध व्यक्त करण्यात आला.

SCROLL FOR NEXT