Beed Accident 
बीड

Beed Accident : वाहतूक कोंडीने घेतले अपघाताचे वळण; पिकअपच्या धडकेत चार जणांसह बैल गंभीर जखमी!

धुळे-सोलापूर महामार्गावर ऊसाचा ट्रॅक्टर पलटी झाल्याने वाहतूक ठप्प!

पुढारी वृत्तसेवा

गेवराई : धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील गेवराई शिवारात दत्तराज पार्कजवळ शनिवारी सायंकाळी ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर पलटी झाल्याने महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली. त्यामुळे वाहनांची कोंडी निर्माण झाली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी महामार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली. मात्र, या पर्यायी मार्गावरही अपघाताची घटना घडल्याने वाहतुकीचा प्रश्न अधिकच गंभीर बनला.

छत्रपती संभाजीनगरहून बीडकडे जाणारी वाहने हेबाग-पिंपळगाव बायपासमार्गे गेवराई शहरातून झमझम पेट्रोल पंपाच्या दिशेने वळविण्यात आली होती. दरम्यान, छत्रपती संभाजीनगरहून जनावरांचे खाद्य घेऊन बीडकडे जाणाऱ्या पिकअप वाहनाच्या चालकाने भरधाव वेगात वाहन चालविताना बाग-पिंपळगाव परिसरात दोन बैलगाड्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात चार जण जखमी झाले असून, बैलही गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

या अपघातानंतर नियंत्रण सुटलेल्या पिकअप वाहनाची पुढे राष्ट्रीय महामार्गावर आडव्या झालेल्या ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरला धडक बसली. त्यामुळे अपघातांची मालिका घडली. आधीच वाहतूक ठप्प झालेली असताना या घटनांमुळे परिस्थिती आणखी बिकट झाली. परिणामी, महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला.

विशेष म्हणजे, महामार्गावरील वाहतूक ठप्प होऊन अपघात घडूनही उशिरापर्यंत आयआरबी कंपनीचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले नसल्याचे दिसून आले. महामार्गावरील वाहतूक सुरळीत करणे, तसेच अपघातग्रस्तांना तातडीने मदत उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित यंत्रणेने तत्काळ कार्यवाही करणे आवश्यक असल्याची प्रतिक्रिया वाहनधारकांमधून व्यक्त होत होती. दरम्यान, अपघातातील जखमींना गेवराई येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT