बीड : ज्ञानराधा मल्टिस्टेटवर राज्यभरात दाखल असलेल्या गुन्ह्यांमधील प्रमुख आरोपी, ज्ञानराधा आणि कुटे समूहाची संचालक असलेल्या अर्चना कुटेला अखेर सीआयडीने ताब्यात घेतले आहे. अर्चना कुटेचा अटकपूर्व जमीनअर्ज यापूर्वी न्यायालयाने फेटाळला होता, मात्र अर्चना कुटे पोलिसांना सापडत नव्हती. कुटेच्या अटकेसाठी यंत्रणेवर मोठ्याप्रमाणावर दबाव आल्यानंतर आणि स्वतः मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भाने सीआयडीच्या निर्देश दिल्यानंतर अखेर अर्चना कुटेला सीआयडीने पुण्यातून ताब्यात घेतले आहे.
छत्रपती संभाजीनगरच्या सीआयडी टीमने पुण्यातून मंगळवारी सायंकाळी अर्चना कुटेला ताब्यात घेतले असून त्यांना छत्रपती संभाजीनगर येथे आणण्यात येणार आहे. बीड जिल्ह्यासह इतर जिल्ह्यात ज्ञानराधा मल्टीस्टेटने ठेवीदारांच्या सुमारे साडेतीन हजार कोटींच्या थकविल्याने ज्ञानराधा मल्टिस्टेच्या विरोधात राज्यात सुमारे ६४ गुन्हे दाखल आहेत. यातील अनेक गुन्ह्यात अर्चना कुटे आरोपी आहे. मात्र अर्चना कुटेला पोलिसांनी अद्याप अटक केले नव्हते. बीड जिल्ह्यात हे प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे असताना देखील अर्चना कुटे पोलिसांना सापडत नव्हती. मध्यन्तरीच्या काळात या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे गेला त्यानंतर कुटे ग्रुपच्या सर्वेसर्वा अर्चना कुटेला छत्रपती संभाजीनगरच्या सीआयडी पथकाने ताब्यात घेतले आहे.