केज : घरकुलाच्या दुसऱ्या हप्त्यासाठी बेबाकी प्रमाणपत्रासाठी दोन हजाराची लाच घेताना केज तालुक्यातील केकतसारणी येथील ग्रामसेवकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगे हात ताब्यात घेतले. गंगाधर ठोंबरे असे या ग्रामसेवकाचे नाव आहे.
केज तालुक्यातील केकतसारणी येथील ग्रामसेवक गंगाधर ठोंबरे यांनी पंतप्रधान आवास घरकुल योजनेतील लाभार्थ्याकडून त्याला दुसऱ्या हप्त्यासाठी लागणाऱ्या बेबाके प्रमाणपत्रासाठी पाच हजार रुपयाची मागणी केली होती. याविरोधात तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार प्रतिबंध विभागाने सापळा रचून आज दिनांक १९ सप्टेंबर, शुक्रवार रोजी दुपारी ग्रामसेवक गंगाधर ठोंबरे याला केज पंचायत समितीच्या आवारात तक्रारदाराकडून दोन हजार रुपयाची लाच घेताना रंगेहात पकडले. लाचलुचपत विभागाने ताब्यात घेतलेला ग्रामसेवक गंगाधर ठोंबरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे प्रक्रिया सुरू आहे.