Goregaon 25 quintal puri bhaji donation
गोरेगाव : मराठा आरक्षणासाठी सकल मराठा समाजाचे आंदोलन मुंबईत सुरू आहे. आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली उपोषण सुरू असून, हजारो आंदोलक ठाण मांडून बसले आहेत. मात्र, सततचा पाऊस व चिखलामुळे आंदोलकांना खाण्या-पिण्याची, राहण्याची मोठी गैरसोय होत आहे.
या पार्श्वभूमीवर आंदोलकांना अन्नसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी गोरेगावातील मराठा समाजाने पुढाकार घेतला आहे. गावकऱ्यांच्या व महिलांच्या सहभागातून तब्बल २५ क्विंटल पुरी-भाजी तयार करण्यात आली असून, ती ३१ ऑगस्ट रोजी दुपारी विशेष वाहनातून मुंबईला रवाना होत आहे. गावातील प्रत्येक कुटुंबाने २ किलो पुरी-भाजीचे योगदान दिले आहे.
समाजातील महिलांनी एकत्र येऊन अन्नसंकलनाची जबाबदारी उचलली. आंदोलन दीर्घकाळ चालल्यास आणखी एक वाहन दोन दिवसांनी पाठविण्याचीही तयारी करण्यात आली आहे. जिल्ह्यातील प्रत्येक गावाने अशा प्रकारे अन्नदानाची जबाबदारी उचलावी, असे आवाहन स्थानिक मराठा बांधव व भगिनींनी केले आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षण मिळेपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. “आता मागे हटणार नाही,” असा घोष मुंबईत घुमत असून, त्याला समाजातून मोठा प्रतिसाद मिळत आहे. शासनाकडून सुविधांकडे दुर्लक्ष होत असल्याने गावपातळीवर समाज एकत्र येऊन आंदोलकांना मदतीचा हात देत आहे.