केज :- पावसाच्या पाण्याने भरलेल्या उकिरड्याच्या खड्ड्यात खेळत गेलेल्या इयत्ता पहिलीच्या वर्गात शिकत असलेल्या सहा वर्ष वयाच्या मुलीचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना केज तालुक्यात घडली आहे.
चिंचोलीमाळी ता. केज येथील शेतकरी अमोल बजगुडे व त्यांची पत्नी रविवारी शेतात सोयाबीन कापणी करण्यासाठी गेले होते. त्यांची इयत्ता पहिलीच्या वर्गात शिकत असलेली मुलगी कु. आर्या अमोल बजगुडे ही सायंकाळी ५:०० वा. च्या सुमारास खेळत - खेळत घरामागे असलेल्या कचरा टाकण्याच्या उकीरड्याच्या खड्ड्यात पावसाच्या साचलेल्या पाण्यात बुडून मरण पावली. शेतातून परत आल्या नंतर मुलगी कु. आर्या ही दिसून न आल्याने तिच्या आई-वडिलांनी तिचा शोध घेतला. मात्र ती आढळून आली नाही. त्या नंतर काही वेळाने ती उकिरड्याच्या खड्ड्यात पडली असल्याची माहिती मिळताच तिला पाण्याबाहेर काढून उपचारासाठी केज येथील रुग्णालयात आणले. मात्र डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केले. या घटनेबद्दल गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.