गेवराई : एकीकडे मुलीचे जमलेले लग्न आणि दुसरीकडे डोक्यावर असलेला कर्जाचा डोंगर, अशा दुहेरी आर्थिक संकटात सापडलेल्या एका पित्याने विष प्राशन करून जीवन संपविल्याची हृदयद्रावक घटना गेवराई तालुक्यातील सुशी तांडा येथे घडली आहे. गोरख शांतीलाल राठोड (वय ४०) असे या मृत शेतकऱ्याचे नाव असून, त्यांच्या निधनाने परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गोरख राठोड हे ऊसतोडणी मजूर म्हणून काम करत होते. सोबतच शेती करून ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत असत. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले आणि एक मुलगी असा परिवार आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांच्या मुलीचा विवाह जमला होता. घरात लग्नाची लगबग सुरू असतानाच गोरख यांना वाढत्या कर्जाची आणि लग्नासाठी लागणाऱ्या आर्थिक तरतुदीची चिंता सतावत होती.
मागील काही वर्षांपासून शेतीतील अल्प उत्पन्न आणि वाढत्या खर्चामुळे त्यांच्यावर कर्जाचा भार वाढला होता. मुलीचे लग्न सन्मानाने पार पाडण्यासाठी पैशांची जुळवाजुळव कोठून करायची, या विवंचनेतून ते गेल्या काही दिवसांपासून नैराश्यात होते. याच मानसिक तणावातून त्यांनी बुधवार, ८ एप्रिल रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास विषारी औषध प्राशन केले.
घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी त्यांना तातडीने गेवराई येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. एका कष्टकरी पित्याने मुलीच्या भविष्याच्या चिंतेपोटी आपली जीवनयात्रा संपवल्याने सुशी तांडा गावावर शोककळा पसरली आहे.