Gevrai Shani temple flood
गजानन चौकटे
गेवराई : पैठणच्या जायकवाडी धरणात वरील धरणातून पाण्याची आवक वाढल्याने धरण जवळपास ९६ टक्क्यांवर पोहोचले आहे. गुरुवारी धरणाच्या अठरा दरवाजातून ३६ हजारांहून अधिक क्युसेकने गोदावरी नदीच्या पात्रात पाणी सोडले होते. त्यात वाढ केल्याने सद्यस्थितीत ४७ हजार क्युसेक पाणी गोदावरीत झेपावल्याने गेवराईतील राक्षसभुवन येथील शनि देवस्थानचे मंदिर पाण्याखाली गेले आहे. तर पंचाळेश्वरचे पात्रातील दत्त देवस्थान पुर्णतः बुडाले आहे.
यंदा मराठवाड्याचे वैभव असलेले पैठण (जि. छत्रपती संभाजीनगर) जायकवाडी धरण जवळपास शंभर टक्क्यावर पोहोचले आहे. वरील धरणातून जवळपास ५५ हजार क्युसेक पाण्याची आवक जायकवाडीत होत असल्याने गुरुवारी (ता.२१)नाथ सागराचे अठरा दरवाजे उघडले आहेत. २८ दरवाज्यांपैकी १८ दरवाजातून ३६ हजार क्युसेक पाणी सोडण्यात आले. रात्री त्यात वाढ होऊन शुक्रवारी त्यात वाढ केल्याने ४७ हजार क्युसेक पाणी गोदावरी नदीच्या पात्रात सोडल्याने गेवराईतील शनि देवस्थान पाण्यात आले आहे. शिवाय पंचाळेश्वरचे दत्त मूर्ती देखील पाण्यात आल्याने गेवराईच्या नदीकाठावरील ३२ गावातील नागरिकांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा दिला आहे.
वरील धरणातून होत असलेल्या पाण्याची आवक पहाता जायकवाडीतून गोदावरी नदीच्या पात्रात कमी-अधिक विसर्ग होणार असून, नदीकाठावरील गावातील नागरिकांनी रतर्क रहावे.- संजय सोनवणे, नायब तहसीलदार, गेवराई
राक्षभुवन संस्थांचे पोलिसांना पत्र २३ ऑगस्टरोजी शनी अमावास्या असल्याने भाविक दर्शनासाठी येत असतात. शनी मंदिरात पाणी आले आहे. विसर्ग सुरू राहिल्यास मंदिरात पाणी पातळी वाढेल या अनुषंगाने सुरक्षेबाबत पोलिसांना पत्र दिले आहे.- भगवानराव पुराणिक, अध्यक्ष, शनि मंदिर संस्थान राक्षभुवन