Atrocity Act case  Pudhari
बीड

Beed Atrocity Case | वाळू प्रकरणानंतर तहसीलदार संदीप खोमणे यांच्या अडचणीत वाढ: माळेगावात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

व्हॉट्सॲप ग्रुपवरील कथित जातीय अपमानप्रकरणी गुन्हा दाखल; घरकुल वाळू प्रकरणामुळे आधीच चर्चेत

पुढारी वृत्तसेवा

Gevrai Tehsildar Sandeep Khomane Police Complaint

गेवराई : घरकुल लाभार्थ्यांच्या नावावर झालेल्या कथित अवैध वाळू उपसा प्रकरणामुळे आधीच चर्चेत असलेले गेवराईचे तहसीलदार संदीप खोमणे यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. बारामती तालुक्यातील जळगाव सुपे येथील एका व्हॉट्सॲप ग्रुपवर अनुसूचित जातीतील व्यक्तीचा कथित जातीय हेतूने अपमान केल्याप्रकरणी तहसीलदार संदीप केशव खोमणे आणि सुनील दत्तू खोमणे (रा. जळगाव सुपे, ता. बारामती) यांच्याविरुद्ध अनुसूचित जाती-जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्यान्वये माळेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी संदीप रमेश खंडाळे (वय ३६, रा. जळगाव सुपे) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १९ एप्रिल २०२५ रोजी रात्री 'आपला गाव, आपला विकास' या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीतील आरक्षणासंदर्भात तहसीलदार, बारामती यांना पाठविण्यासाठी तयार केलेले पत्र फिर्यादी यांनी शेअर केले होते.

यानंतर ग्रुपमध्ये झालेल्या चर्चेदरम्यान फिर्यादी हे हिंदू मांग समाजाचे असल्याची माहिती असतानाही आरोपींनी कथितपणे जातीय हेतूने अपमानास्पद वक्तव्य केल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. तसेच ग्रुपमधील इतर सदस्यांमध्ये फिर्यादीविषयी तिरस्कार आणि द्वेष निर्माण होईल, अशा प्रकारचे वर्तन करण्यात आल्याचाही आरोप करण्यात आला आहे. फिर्यादीला व्हॉट्सॲप ग्रुपमधून काढून टाकल्याचाही उल्लेख तक्रारीत करण्यात आला आहे.

या फिर्यादीवरून माळेगाव पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध अॅट्रॉसिटी कायद्यातील विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक कुलदीप दत्तात्रय करीत आहेत.

घरकुल वाळू प्रकरणामुळे आधीच चर्चेत

गेवराई तालुक्यातील घरकुल लाभार्थ्यांच्या नावावर झालेल्या कथित अवैध वाळू उपसा प्रकरणात तहसीलदार संदीप खोमणे यांच्यावर यापूर्वीही गंभीर आरोप करण्यात आले होते. गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली शंभर कोटी रुपयांचे कथित अवैध वाळू सिंडिकेट कार्यरत असल्याचा आरोप केला होता. या प्रकरणाची चौकशी आणि प्रशासकीय प्रक्रिया स्वतंत्रपणे सुरू असल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, खोमणे यांच्या निलंबनाचा प्रस्ताव बीड जिल्हाधिकाऱ्यांनी महसूल विभागाच्या वरिष्ठांकडे पाठविल्याची माहिती समोर आली आहे. अशातच त्यांच्या मूळगावी अॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल झाल्याने ते पुन्हा चर्चेत आले असून, या प्रकरणात प्रशासन कोणती भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT