गेवराई : तालुक्यातील राजापूर फाटा येथे दोन व्यक्तींमधील वाद सोडवण्यासाठी गेलेल्या ८६ वर्षीय वृद्धावर हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना मंगळवारी (दि.२४) सायंकाळी ७ च्या सुमारास घडली. उमाजी सोपान पटेकर (वय ८६, व्यवसाय शेती, रा. राजापूर फाटा, ता. गेवराई) जखमी वृद्धाचे नाव आहे.
उमाजी पटेकर यांनी बुधवारी (दि.२५) दिलेल्या तक्रारीवरून तलवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी अच्यूत किसन सोनवणे (रा. राजापूर फाटा) याचा आणि एका व्यक्तीचा वाद सुरू होता. यावेळी उमाजी पाटेकर हे त्यांचा वाद सोडवायला गेले. त्यावेळी सोनवणे याने “तू आमच्या भांडणात का पडतोस” असे म्हणत शिवीगाळ केली. त्यानंतर हातातील काठीने पटेकर यांच्या डोक्यावर वार करून त्यांना गंभीर जखमी केले. तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण करत त्यांच्या पायावर प्रहार केल्याने त्यांचा पाय फ्रॅक्चर झाल्याचे तक्रारीत नमूद आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस कर्मचारी काकडे हे करीत आहेत.