Gevrai Accident Case Registered
गेवराई : शहरातील विठू माउली हॉस्पिटलजवळ ट्रॅक्टर आणि कार यांच्यात झालेल्या भीषण अपघातात एकाचा मृत्यू झाला, तर एक महिला गंभीर जखमी झाली. ही घटना ३ मार्च २०२६ रोजी सायंकाळी घडली होती. मात्र, या प्रकरणी तब्बल ३८ दिवसांनंतर गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ट्रॅक्टर (क्र. एमएच-२०-एफयू-८३१२) आणि कार (क्र. एमएच-१४-जेई-३६४६) यांच्यात जोरदार धडक झाली. ट्रॅक्टर चालकाने निष्काळजीपणे तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन करत वाहन चालविल्यामुळे हा अपघात झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या अपघातात संतोष अंकुशराव पाचपुते यांचा मृत्यू झाला. तर गीता रमेश देशमुख (वय ४२, रा. भाग्यनगर, गेवराई) या गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी संबंधित ट्रॅक्टर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस कर्मचारी डोळस करत आहेत.