Gevarai Sanjay Gopwad Suspension
सुभाष मुळे
गेवराई : उपनोंदणी कार्यालयातील दुय्यम निबंधक संजय गोपवाड यांच्यावर शासनाने निलंबनाची कारवाई केली आहे. या निर्णयामुळे संपूर्ण नोंदणी विभागात खळबळ उडाली आहे. नोंदणी शुल्क आणि मुद्रांक शुल्कातील गंभीर अनियमितता उघड झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सन २०२० ते २०२१ या कालावधीत सादर करण्यात आलेल्या दस्तऐवजांची चौकशी करण्यात आली असता एकूण १४ व्यवहारांमध्ये गंभीर त्रुटी व अनियमितता आढळून आल्या. या अनियमिततेमुळे शासनाला १ लाख २३ हजार ४०० रुपयांचे महसूल नुकसान झाल्याचे अहवालात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. सदर अहवालाच्या आधारे संबंधित अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार दुय्यम निबंधक संजय गोपवाड यांना तात्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आले आहे.
या प्रकरणामुळे विभागात मोठी चर्चा रंगली असून, नोंदणी विभागातील इतर कर्मचाऱ्यांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शासन महसुलाशी संबंधित व्यवहारांमध्ये पारदर्शकता राखण्यासाठी आता अधिक कडक पावले उचलली जाण्याची शक्यता असून स्थानिक नागरिक आणि विविध वर्गातूनही या निर्णयाचे स्वागत करण्यात येत असून, शासन महसूल गळती रोखण्यासाठी कठोर कारवाई आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.