Georai Panchayat Samiti engineer arrested
गेवराई: गेवराई पंचायत समिती कार्यालयातील अभियंत्याने एका शेतकर्यांकडे गायगोठ्याची फाईल करण्यासाठी 1000 रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. त्या अभियंत्याच्या मुसक्या बीडच्या लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने आज (दि.२२) आवळल्या आहेत. विनायक राठोड असे लाचखोर अभियंत्याचे नाव आहे.
विनायक राठोड याने 19 नोव्हेंबर रोजी 1000 रुपयांच्या लाचेची मागणी त्याच्या बीड शहरातील अंबिका चौकातील एका प्रायव्हेट कार्यालयात केली होती. संबंधित तक्रारदाराला लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी बीडच्या लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार दाखल केली. तक्रारीची खात्री पटल्यानंतर एसीबीने सापळा लावला.
परंतु, राठोडला संशय आल्यानंतर त्याने तक्रारदाराला टाळायला सुरूवात केली. मात्र, लाचेची मागणी केल्यावरून विनायक राठोड यास बीड एसीबीने बेड्या ठोकल्या आहेत. ही कारवाई बीडचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे डीवायएसपी सोपान चित्तमपल्ले यांनी आज दुपारी सव्वा एकच्या सुमारास केली.
गेवराई पंचायत समिती म्हणजे भ्रष्टाचाराचा अट्टा आहे. छोट्या मोठ्या कामांसाठी येथे हमखास जिरी मिरी घेतली जात असल्याची चर्चा आहे. परंतु वरिष्ठ अधिकारी याकडे डोळेझाक करतात, असा आरोप नागरिकांतून केला जात आहे.