Georai Municipal Council election
गेवराई: नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेवराई शहरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. माजी आमदार लक्ष्मण पवार यांच्या घरावर अज्ञातांनी दगडफेक केल्याची गंभीर घटना घडली. या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून पवार गट आणि पंडित गट यांच्यातील वाद चिघळल्याने वातावरण आणखी तापले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही गट आमनेसामने आले आणि किरकोळ वादाचे रूपांतर क्षणात मोठ्या राड्यात झाले. रस्त्यावर धुमश्चक्रीचे दृश्य पाहायला मिळाले. संतप्त जमावाने काही वाहनांची तोडफोड करत अनेक गाड्यांच्या काचा फोडल्या. अचानक वाढलेल्या या हिंसक प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
तणावाची माहिती मिळताच गेवराई पोलिसांनी मोठा फौजफाटा दाखल करून परिस्थिती ताब्यात घेतली. पोलिसांनी दोन्ही गटांना पांगवून परिस्थिती नियंत्रणात आणली असून घटनास्थळी अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
या घटनेनंतर शहरात राजकीय हालचालीही वाढल्या आहेत. निवडणुकीच्या तोंडावर घडलेला हा प्रकार प्रशासनासाठी मोठे आव्हान ठरला आहे. पुढील अनिष्ट प्रकार टाळण्यासाठी पोलिसांनी गस्त वाढवली असून शहरात पुन्हा शांतता प्रस्थापित व्हावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.