Beed Crime news 
बीड

Beed Crime news | आमचा किंग कृष्णा आंधळे, तुमचा बाप जयराम चाटे येतोय....?

असे म्हणून पाच जणांनी डोळ्यात मिरची पूड टाकून केला कत्तीने प्राणघातक हल्ला

पुढारी वृत्तसेवा

गौतम बचुटे

केज : संतोष देशमुख हत्याकांडातील १४ कारावासातील आरोपी जयराम चाटे हा त्याच्या भावाच्या तेराव्यानिमित्त त्याच्या गावी येत असल्याच्या पार्श्वभूमीवर केज तालुक्यात पाच जणांनी डोळ्यात मिरची पूड टाकून एकावर कत्तीने प्राणघातक हल्ला केला. तसेच संतोष देशमुख यांच्या हत्येतील फरार आरोपी कृष्णा आंधळे आमचा पॅटर्न असे म्हणून हल्ला केला आहे.

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून क्रूरपणे हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात गेल्या १४ महिन्यांपासून तुरुंगात असलेला आरोपी जयराम माणिक चाटे वय (२२ वर्ष) याचा भाऊ श्रीराम माणिक चाटे याचा २ मार्च रोजी दिव्यांगत्वामुळे घरात पडून असल्याने त्याचा मृत्यू झाला होता. या भावाच्या बाराव्याच्या विधीसाठी हजर राहण्याची परवानगी जयराम चाटे याने वकिलामार्फत मागितली होती. न्यायालयाने परवानगी दिल्याने जयराम चाटे यास पोलीस बंदोबस्तात कारागृहातून शुक्रवारी तांबवा गावात आणण्यात येणार होते.

दरम्यान या पार्श्वभूमीवर तांबवा गावांत नरसिंग उर्फ संग्राम अभिमान चाटे वय (२५ वर्ष) हे १२ मार्च रोजी दुपारी १.३० ते २ वा.च्या दरम्यान त्यांचा आदित्य वसंत बडे याच्यासह दुचाकीवरून शेतात जात होते. त्यांचा दुचाकीवरून पाठलाग करीत दया विलास चाटे व शरद परमेश्वर चाटे हे आले. तर समोरून एका दुचाकीवर अमोल अनिल ठोंबरे, सागर रामधन चाटे, गोट्या भालेकर हे तिघे आले. त्यांनी नरसिंग चाटे हा बसलेली दुचाकी अडविली.

दया चाटे याने जुन्या भांडणाची कुरापत काढून आज तुला जिवंत ठेवत नाही. असे म्हणत त्याने जिवे मारण्याच्या उद्देशाने गळ्यावर कत्तीने वार करीत असताना नरसिंग याने पाठीमागे सरकून वार चुकवला. त्यांना नरसिंह याने तुमचे काय केले ? अशी विचारणा केली असता, दया याने आमचा किंग पॅटर्न कृष्णा आंधळे - १३१३ तुला दाखवतो. तुला आज जिवंत ठेवत नाही, तुमचा बाप जयराम चाटे उ‌द्या येतोय. असे म्हणत आईवर शिवी देत त्याने कत्तीने डोक्यावर वार केल्याने गंभीर दुखापत झाली. तर शरद चाटे याने मिरची पुड डोळ्यात टाकली. इतरांनी रॉडने त्याच्या पाठीत, खांद्यावर व मानेवर मारहाण केल्याने तो बेशुध्द झाला. त्यानंतर त्याचा मित्र आदित्य बडे याने तांबवा शिवारातील साने गुरुजी वि‌द्यालयाजवळ पाणी पाजल्याने त्याला शुध्द आली.

दरम्यान नरसिंग उर्फ संग्राम अभिमान चाटे याला उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात नेले. अशी तक्रार नरसिंग उर्फ संग्राम चाटे याने दिल्यावरून दया चाटे, शरद चाटे, अमोल ठोंबरे, सागर चाटे, गोट्या भालेकर या पाच जणां विरुद्ध केज पोलिसात गु. र. नं. १२८/२०२६ भा. न्या. सं. १०९, ११५(२), ११८(१), ११८(२), १८९(२), १९०, १९१(२), १९१(३), ३५१(२), ३५२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक सुकुमार बनसोडे हे पुढील तपास करीत आहेत.

फरार कृष्णा आंधळे आणि जयराम चाटे यांची दहशत दाखवून हल्ला

नरसिंग उर्फ संग्राम चाटे याच्या डोळ्यात मिरची पूड टाकून कत्तीने वार करण्यात आहे. मात्र मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण व खून प्रकरणातील पोलिसांना अद्याप न सापडलेला कृष्णा आंधळे आणि १४ महिन्यांपासून कारागृहात असलेला जयराम चाटे यांच्या नावांची दहशत तसेच चाटे यांच्या टोळ्या आणखी परिसरात सक्रीय असल्याचे यावरून समजत असल्याचेही पुढे आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT