Driver Dies in Accident
टाकरवन: तालुक्यातील टाकरवन फाटा परिसरात स्कॉर्पिओ आणि आयशर टेम्पो यांच्यात झालेल्या भीषण अपघातात स्कॉर्पिओ चालकाचा उपचारासाठी नेत असताना वाटेतच मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत एक दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गडी–सावरगाव मार्गावरील टाकरवन फाट्याजवळ एका भरधाव स्कॉर्पिओने प्रथम एका दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यानंतर पुढे असलेल्या आयशरला पाठीमागून धडक दिल्याने हा भीषण अपघात घडला.
धडकेत स्कॉर्पिओ चालक गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने उपचारासाठी माजलगाव येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात येत होते; मात्र रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच वाटेत त्याचा मृत्यू झाला. संतोष रामभाऊ भुबे (वय ३४, रा. टाकरवन) असे मयत चालकाचे नाव आहे.
दरम्यान, या अपघातात जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव ज्ञानेश्वर काळे (रा. धर्मेवाडी) असे असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.