Accident News Pudhari
बीड

Beed Accident | गढी उड्डाणपुलावर भीषण अपघात; अज्ञात ट्रकची पिकअपला धडक, २५ भाविक जखमी

भगवान गडावरून दर्शन घेऊन शेगावकडे निघालेल्या भाविकांच्या वाहनाला पाठीमागून ट्रकची जोरदार धडक; गंभीर जखमींना बीड जिल्हा रुग्णालयात केले दाखल

पुढारी वृत्तसेवा

गेवराई : धुळे–सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील गढी उड्डाणपुलावर गुरुवारी सायंकाळी सुमारे सहा वाजण्याच्या सुमारास अज्ञात ट्रकने पिकअप वाहनाला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात सुमारे २५ भाविक जखमी झाले. जखमींवर गेवराई येथील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले असून, गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी बीड जिल्हा रुग्णालयात रेफर करण्यात आले आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मोहज देवडे येथील भाविक भगवान गडावर दर्शन घेऊन शेगावकडे निघाले होते. पिकअप वाहनात महिला, पुरुष आणि लहान मुलांसह सुमारे २५ भाविक प्रवास करत होते. गढी उड्डाणपुलावर आल्यानंतर पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या अज्ञात ट्रकने पिकअपला जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी होती की वाहनातील अनेक भाविक जखमी झाले.

या अपघातात राधाकिसन देवडे, पार्थ देवडे, प्रभावती देवडे, मीरा देवडे, गोवर्धन देवडे, रत्नमाला देवडे, भाऊसाहेब देवडे, संभाजी देवडे यांच्यासह अन्य भाविक जखमी झाले. तसेच संगीता वाघचौरे, शांताबाई गाडेकर, विमल देवडे, मंगल काटे, नारायण काटे, मंगल देवडे, विनायक डेंगळे, पार्वती काटे, राजेंद्र देवडे, कार्तिक चव्हाण यांच्यासह इतर गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी बीड जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.

अपघाताची माहिती मिळताच गेवराई पोलीस, महामार्ग पोलीस, रुग्णवाहिका कर्मचारी व स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. जखमींना तात्काळ उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

दरम्यान, अपघातानंतर अज्ञात ट्रक चालक वाहनासह घटनास्थळावरून फरार झाला असून, त्याचा शोध पोलीस घेत आहेत. या अपघातामुळे काही काळ धुळे–सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT