बीड जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून पेट्रोल व डिझेलची टंचाई जाणवत आहे.पेट्रोल पंपावर लांब रांगा लागत आहेत. pudhari photo
बीड

Beed fuel shortage : प्रशासन गार; सर्वसामान्य बेजार!

इंधन टंचाईचा चौथा दिवस; अधिकारी बैठकांमध्ये मग्न

पुढारी वृत्तसेवा

बीड ः बीड जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून पेट्रोल व डिझेलची टंचाई जाणवत आहे. ज्या ठिकाणी पेट्रोल, डिझेल उपलब्ध आहे त्या ठिकाणी लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत. तर अनेक ठिकाणी नो स्टॉकचे बोर्ड लागले आहेत. यामुळे सर्वसामान्य नागरिक बेजार झालेले असतांना प्रशासन मात्र एसीच्या हवेत गार असल्याने संताप व्यक्त होत आहे.

बीड जिल्ह्यात गेल्या महिनाभरापासून इंधन टंचाई जाणवत आहे. महिनाभरापूर्वी इंधन टंचाईमुळे सर्वसामान्य हैराण झाले होते, त्यानंतर काही काळ पुरवठा सुरळीत राहिला. परंतु आता पुन्हा एकदा पेट्रोल व डिझेल टंचाईला सर्वसामान्यांना सामोरे जाण्याची वेळ आली आहे. पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांचा हाता-पाया पडण्याची वेळ या सर्वांवर आली आहे.

ज्या ठिकाणी पेट्रोल-डिझेल उपलब्ध आहे, त्या ठिकाणी रणरणत्या उन्हात अथवा पहाटेपर्यंत रांगेत थांबण्याची वेळ येत आहे. एकीकडे इंधन टंचाईमुळे ही परिस्थिती निर्माण झालेली असतांना प्रशासनाकडून मात्र केवळ बैठकांचा फार्स करत आज 63 टँकर येणार, उद्या 90 येणार असे आकडे जाहीर केले जात आहेत. परंतु आलेले हे टँकर नेमके जातात कुठे? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. या परिस्थितीतून लवकर सुटका करावी अशी मागणी होत असतांना लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकारी मात्र या प्रश्नाकडे फारसे गांभीर्याने पाहत नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

इंधनाचा काळाबाजार जोरात

एकीकडे पेट्रोल आणि डिझेल पंपावर मिळत नसताना काळा बाजार करणाऱ्यांकडे मात्र याचा पुरेसा साठा पहायला मिळत आहे. ग्रामीण भागात चक्क किराणा दुकानातून पेट्रोल आणि डिझेल जादा दराने विकले जात आहे. यामध्ये काही पेट्रोल पंपचालकांची मिलीभगत असल्याचा आरोप देखील केला जात आहे.

प्रशासनाला गांभीर्य नाही!

परीक्षा, लग्नसराई, शेती मशागतीचा कालावधी सुरू असताना जिल्ह्यात इंधन टंचाई जाणवत आहे. यावर प्रशासनाने युद्ध पातळीवर उपाययोजना करणे गरजेचे असतांना सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले तर दुसरीकडे सर्वसामान्यांना मात्र त्रास सहन करावा लागला. पगारापुरते काम करणाऱ्या या अधिकाऱ्यांना आमचा त्रास काय कळणार? असा सवाल देखील यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT