Beed Education Scam 
बीड

Beed Education Scam : परराज्यातील विद्यार्थ्यांचे कागदोपत्री प्रवेश दाखवणाऱ्या मुख्याध्यापकाविरुद्ध गुन्हा! मोठ्या रॅकेटची शक्यता?

संच मान्यता मिळवण्यासाठी सारा खटाटोप, बीड मधील चंपावती प्राथमिक विद्यालयातील बोगस विद्यार्थी प्रकरण

पुढारी वृत्तसेवा

बीड : बीड शहरातील चंपावती प्राथमिक विद्यालयातील विद्यार्थी संख्येच्या नोंदींमध्ये तफावत आढळल्याप्रकरणी शाळेचे मुख्याध्यापक सारंग तुकाराम जोशी (वय ३५, रा. कॅनॉल रोड, बीड) यांच्याविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गटशिक्षण अधिकारी प्रणिता केशवराव गंगाखेडकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून १५ ऑक्टोबर रोजी ही कारवाई करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १ ते ७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत चंपावती प्राथमिक विद्यालयात चौकशी समितीच्या सदस्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन तपासणी केली. यावेळी हजेरी पटावरील विद्यार्थ्यांची संख्या, चालू वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची माहिती आणि प्रत्यक्ष वर्गातील विद्यार्थी यांची पडताळणी करण्यात आली.

तसेच, केंद्रप्रमुखांच्या लॉगिनवरून यू-डायस (UDISE) पोर्टल आणि स्टुडंट पोर्टलवरील माहितीची तपासणी केली असता, पोर्टलवरील नोंदी आणि हजेरी पटावरील विद्यार्थ्यांच्या संख्येत तफावत आढळल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

या तफावतीबाबत चौकशी समितीने विचारणा केली असता, विद्यार्थ्यांना ड्रॉपबॉक्समध्ये टाकल्याचा तोंडी खुलासा करण्यात आल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. मात्र, विद्यार्थ्यांच्या संख्येतील तफावतीबाबत समाधानकारक माहिती न मिळाल्याने शाळेचे मुख्याध्यापक सारंग जोशी यांनी प्रशासनाची फसवणूक केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.

या प्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३१८(४), ३३६(३), ३४०(२) आणि ३३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक बल्लाळ यांच्या आदेशाने पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.

संच मान्यता मिळवण्यासाठी सारा खटाटोप

चंपावती प्राथमिक विद्यालयात असलेल्या शिक्षकांची संख्या कायम राहावी, कोणताही शिक्षक अतिरिक्त ठरू नये यासाठी पर राज्यातून विद्यार्थ्यांचे कागदोपत्री प्रवेश दाखवण्यात आले होते. यासाठी पैसे देखील मोजले गेल्याचा आरोप होत आहे. परंतु हा सगळा प्रकार उघडकीस आल्यानंतर संस्थेकडून सारवासारव केली जात असले तरी थेट प्रशासकीय अधिकाऱ्याने मुख्याध्यापकावर गुन्हा दाखल केल्याने ही बनवाबनवी उघड पडली आहे.

निष्पक्ष तपास झाल्यास रॅकेट समोर येणार!

विद्यार्थ्यांची बनावट नोंद दाखवल्या त्या प्रकरणात सारंग जोशी यांच्यावर गुन्हा दाखल झाला असला तरी हा सगळा प्रकार त्यांना नेमका कोणी करायला लावला? त्यासाठी संस्थेच्या संचालक मंडळाकडून त्यांच्यावर काही दबाव होता का? की सर्वांच्या परस्पर जोशी यांनीच हा निर्णय घेतला होता? अथवा एखाद्या शिक्षकाने केलेली ही चूक जोशी यांना भोवली ? हे परराज्यातील विद्यार्थी कोणी पुरवले होते? त्याच व्यक्तीने आणखी कोणत्या कोणत्या शाळांना असे विद्यार्थी पुरवले? या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी पाळेमुळे खोदावी लागणार आहेत... त्याकरिता तेवढाच गांभीर्याने तपास देखील तपास अधिकाऱ्यांना करावा लागणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT