Beed Footage of stone-pelting case take police
बीड, पुढारी वृत्तसेवा : गेवराई येथील कृष्णाई निवासस्थानावर आणि कार्यालयावर झालेल्या हल्ल्याचे तीव्र पडसाद उमटत आहेत. या प्रकरणी माजी आमदार अमरसिंह पंडित आणि आमदार विजयसिंह पंडित यांनी गुरुवारी (दि.४) दुपारी पोलिस अधीक्षक नवनीत कांवत यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी हल्ल्याचे सीसीटीव्ही फुटेज असलेला पेनड्राईव्ह पोलिसांकडे सुपूर्द करत, हा हल्ला पूर्वनियोजित कट असून, अमरसिंह पंडित यांच्या जीवाला धोका असल्याचा गंभीर आरोप केला.
निवडणुकीच्या दिवशी घडलेल्या या राडा प्रकरणी पंडितांनी पोलिस अधीक्षकांना सविस्तर निवेदन दिले. यावेळी पत्रकारांशी बोलताना आ. विजयसिंह पंडित म्हणाले की, त्रिंबक पवार याने गुंड आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना सोबत घेऊन आमच्या कृष्णाई कार्यालयावर हल्ला केला. याचे सर्व पुरावे आणि सीसीटीव्ही फुटेज आम्ही पोलिसांना दिले आहेत. त्रिंबक पवार हा १९९७च्या एका खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा भोगून चांगल्या वर्तणुकीच्या बॉण्डवर बाहेर आलेला आहे.
सीसीटीव्हीमध्ये कैद झाला थरार
पोलिसांना दिलेल्या फुटेजमध्ये त्रिंबक पवार स्वतः गाडी चालवत येत असल्याचे आणि त्याने तिथे उभ्या असलेल्या वाहनाला जाणीव-पूर्वक धडक दिल्याचे दिसत आहे, असा दावा पंडितांनी केला. अमृत डावकर यांच्या जबाबातही जिवे मारण्याचे षडयंत्र होते, असे नमूद करण्यात आले आहे.