Beed Flood Tragedy 
बीड

हृदयद्रावक! अतिवृष्टीने होत्याचं नव्हतं झालं...अंध मुलीसह वयोवृद्ध पिता अंधारात

Beed Flood Tragedy: समाजातील दानशूरांनी ‘जीवन'दान द्यावे: विठ्ठल गर्दे यांची आर्त विनंती

पुढारी वृत्तसेवा

गजानन चौकटे

राजापूर : अतिवृष्टीने ज्यांच्या संसाराची राखरांगोळी झाली आहे, अशा एका अंध, दिव्यांग मुलीचे आणि तिच्या वयोवृद्ध वडिलांचे दुःख पाहून पाहणाऱ्याचे हृदय हेलावून जात आहे. राजापूर गावात राहणाऱ्या या गरीब कुटुंबाची अवस्था आज अत्यंत बिकट झाली आहे. या दोघांच्या डोळ्यांतून वाहणारे अश्रू केवळ वेदना सांगत नाहीत, तर "आम्हाला मदत करा" अशी मूक विनंती करत आहेत.

डोळ्यावर पट्टी आणि घरात अंधार

नंदा विठ्ठल गर्दे ही मुलगी जन्मतःच अंध आणि दिव्यांग आहे. तिचे वडील विठ्ठल किसन गर्दे हे आता वृद्ध झाले आहेत. हे दोघेच एकमेकांचा एकमेव आधार आहेत. त्यांच्या राजापूर गावातील घराची अवस्था खूप वाईट आहे. घराला गळती लागली आहे, भिंती पूर्णपणे ओल्या आहेत आणि सर्वात गंभीर म्हणजे, घरात वीज देखील नाही. सतत तीन दिवस पडलेल्या मुसळधार पावसामुळे घरात पाणी शिरले आणि मोलमजुरी करून त्यांनी जे काही थोडे सामान जमवले होते, त्याचा पूर्णपणे नाश झाला.

आता अंधारात बसून दिवस काढतोय…

हताश झालेल्या विठ्ठल गर्दे यांनी आपली वेदना बोलून दाखवली. ते म्हणाले, “पावसाचं पाणी घरात घुसले आणि सगळं वाहून गेलं. आता आमच्याकडे खायला धान्य नाही आणि घालायला कपडेही नाहीत. अंधारात बसून दिवस काढावे लागत आहेत. आमची ही अवस्था कोणीतरी पाहावी.” नंदा ही पूर्ण अंध असल्याने ती फक्त वडिलांचा हात धरूनच घरात इकडेतिकडे चालते. तिच्या चेहऱ्यावर एक निरागस हसू असले तरी, तिची परिस्थिती पाहून कोणाचेही मन हेलावेल.

स्थानिक मदतीचा प्रयत्न, पण मोठ्या आधाराची गरज

वडील आणि मुलीची ही दयनीय अवस्था पाहून गावातील काही लोकांनी आपापल्या परीने त्यांना थोडीफार मदत देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. मात्र, या दोघांचा उद्ध्वस्त झालेला संसार पुन्हा उभा करण्यासाठी शासनाच्या मदतीसोबतच समाजातील दानशूर व मोठ्या मनाच्या लोकांच्या मदतीची नितांत गरज आहे. स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की, अशा गरजू आणि निराधार कुटुंबाला, विशेषतः अंध मुलीला आणि तिच्या वयोवृद्ध वडिलांना मदत करणे हेच खऱ्या मानवतेचे कार्य ठरेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT